सत्य-अहिंसा व संविधान सुरक्षेचा ‘समास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 08:14 PM2018-01-24T20:14:33+5:302018-01-24T20:26:00+5:30
देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत येत्या २९ जानेवारीपासून सेवाग्राम व नागपुरात ‘समास-२०१८ ’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या देशातील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे. अभिव्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात आहे. संविधानाचे मूल्य धोक्यात आले आहे. हा सर्व प्रकार एकूणच लोकशाहीसाठी घातक आहे. तेव्हा देशातील लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आज महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे. या दोन विचारांना जोडून लोकशाही वाचवण्यासाठी दक्षिणायनने पुढाकार घेत ‘सत्य -अहिंसा व संविधान सुरक्षा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत येत्या २९ जानेवारीपासून सेवाग्राम व नागपुरात ‘समास-२०१८ ’चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. गणेश देवी यांच्यासह देशभरातील लेखक, विचारवंत, नाट्य व चित्रपट कलावंत, पत्रकार, निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी याबाबत पत्रपरिषदेत माहिती माहिती. यावेळी प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने, अमिताभ पावडे, बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. २९ जानेवारी रोजी वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात सायंकाळी ६ वाजता प्रार्थनसभेने कार्यक्रमला सुरुवात होईल. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार दिवंगत गौरी लंकेश यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहुभाषिक आदरांजली अर्पण करण्यात येईल. विद्या बाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या सभेत के. नीला (कन्नड), राजेंद्र चेन्नी (कन्नड), मनिशी जानी (गुजराती), दामोदर मौझो (कोकणी), विनीत तिवारी (हिंदी), इंद्रनील आचार्य (बंगाली), हमीद दाभोळकर (इंग्रजी), मेघा पानसरे (मराठी), प्रज्ञा पवार (मराठी), उल्का महाजन (मराठी) आदी सहभागी होतील.
३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वर्तमान समजून घेताना या सत्रात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राजमोहन गांधी यांची भाषणे होतील.
यानंतर ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दक्षिणायनचे लेखक, पत्रकार व कलावंत हे नागपुरातील विविध २० महाविद्यालयांमध्ये ‘वर्तमान समजून घेताना’ या शिर्षकांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दुपारी ४ वाजता दीक्षाभूमीवरून धनवटे नॅशनल कॉलेजपर्यंत मौन पदयात्रा काढण्यात येईल.
दरम्यान व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केले जाईल. यानंतर धनवटे नॅशनल कॉलेज धंतोली येथे सभागृहात जाहीर सभा होईल. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे अध्यक्षस्थानी राहतील. के. नीला (कर्नाटक), उत्तम परमार (गुजरात), के. के. चक्रवर्ती (दिल्ली), प्रज्ञा दया पवार (मुंबई), धनाजी गुरव (महाराष्ट्र), जया मेहता (मध्य प्रदेश) आणि दिलीप प्रभुदेसाई (गोवा) प्रमुख अतिथी राहतील. राजमोहन गांधी, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत या समासचा समारोप होईल.