पत्रकारितेतून विकासाला गती देण्याचा प्रयत्न व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2016 02:40 AM2016-03-26T02:40:31+5:302016-03-26T02:40:31+5:30

स्व. प्रकाश देशपांडे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. ते कवी ग्रेस यांचे लाडके विद्यार्थी होते.

Try to speed up the development of journalism | पत्रकारितेतून विकासाला गती देण्याचा प्रयत्न व्हावा

पत्रकारितेतून विकासाला गती देण्याचा प्रयत्न व्हावा

Next

नितीन गडकरी : प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार राजू मिश्रा यांना प्रदान
नागपूर : स्व. प्रकाश देशपांडे प्रतिभावंत आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार होते. ते कवी ग्रेस यांचे लाडके विद्यार्थी होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारितेतून समाजाला समोर नेणाऱ्या विकासाला गती देणाऱ्या बातम्या यायला हव्यात पण सध्याच्या २४ बाय ७ मुळे चांगल्या बाबींसोबत वाईट बाबींनाही प्रसिद्धी मिळते. माध्यमांनी चांगल्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करावा, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार’ यंदा डॉ. राजू मिश्रा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खा. दत्ता मेघे, ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी, ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद आणि डॉ. गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले, प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना आपण भाजपचे अध्यक्ष होतो. त्यावेळी किंगफिशर एअरलाईन्स अडचणीत आली. ही कंपनी बंद पडू नये म्हणून आपण मुखर्जी यांना विनंती केली होती. कारण एखादी कंपनी बंद पडते तेव्हा त्यात काम करणारे हजारो लोक बेरोजगार होतात. या कंपनीशी व्यक्तीश: आपला कुठलाही संबंध नव्हता. माल्यांबद्दलही आता बोलले जात असले तरी गेल्या २५ वर्षात बँकांनी माल्यांकडून लाभही कमाविला.
व्यवसायात वाईट स्थिती येते. पण कर्ज परत करता आले नाही तर सर्वांच्याच नजरेत तो उद्योगपती गुन्हेगार ठरतो. पण अशाने उद्योग उभे कसे राहतील. एल अँड टी कंपनीला अमरावती ते जळगाव रस्ता तयार करण्याचे काम दिले होते. त्यावेळी कंपनीच्या चेअरमनने काही काळानंतर कंपनीची स्थिती वाईट असून ते काम करण्यास नकार दिला. यामागे त्यांची व्यावसायिक उद्विग्नता होती. काही काळाने कंपनीची स्थिती सुधारली आणि आता ते १५ हजार कोटींच्या नऊ प्रोजेक्टवर काम करीत आहेत. या कंपनीशीही माझा काहीही संबंध नाही पण कुठलाच उद्योग बंद पडू नये, यासाठी माझा प्रयत्न आहे. नागपुरात मॉडेल मिल, एम्प्रेस मिल बंद पडली. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले. गरिबी दूर करण्यासाठी उद्योग उभे राहणे आवश्यक आहे. राजू मिश्रा यांनी अशा प्रश्नांवर सातत्याने लिहीत राहावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले, साधारणत: ८९ साली मी नागपुरात आलो. त्यावेळी लोकमत समाचारचा प्रारंभ होता. तेव्हापासून सातत्याने नागपुरातील स्थित्यंतराकडे माझे लक्ष आहे. बाळासाहेब देवरस, भाई बर्धन यांच्यासह अनेकदा चर्चा करता आली. या काळात राजकारणात झालेला बदल अनुभविला.
पत्रकार म्हणून स्थित्यंतरे अनुभवताच आज झालेले आणि होत असलेले बदलही दिसत आहेत. पण पत्रकारांना सातत्याने योग्य वैचारिक संतुलन साधणे आवश्यक ठरते. जो सत्तेसह राहतो तो पत्रकारच नाही. या दृष्टीने पत्रकारिता जवळपास संपते की काय? अशी स्थिती आहे. दिल्लीतले शेकडो पत्रकार पत्रकारिता सोडून कॉर्पोरेट्ससाठी काम करीत आहेत. अशा वेळी एका पत्रकाराला पुरस्कृत करण्यात येत आहे, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले.
लक्ष्मणराव जोशी म्हणाले, प्रकाश देशपांडे आणि राजू मिश्रा या दोघांसोबतही मी काम केले आहे. हे दोघेही प्रामाणिकपणे काम करणारे आणि प्रभावी लेखन करणारे पत्रकार. पत्रकार सहनिवास निर्माण करण्यात प्रकाश देशपांडे यांनी संघर्ष केला. त्यांच्या नावाचा हा पुरस्क ार एका योग्य व्यक्तीला देताना समाधान वाटते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार अ‍ॅड. निशांत गांधी यांनी मानले. याप्रसंगी राजू मिश्रा यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचेच आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Try to speed up the development of journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.