नागपुरात पिज्जा हट लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 04:05 PM2017-10-31T16:05:20+5:302017-10-31T16:07:38+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सोमवारी रात्री बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिज्जा हटच्या शाखेत शिरलेल्या दोन सशस्त्र लुटारूंनी रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले.
लक्ष्मीनगरातील श्रद्धानंद पेठमध्ये पिज्जा हटची शाखा आहे. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास आतमध्ये आवराआवर सुरू असताना शाखेसमोर एका मोपेडवर तीन जण आले. एक बाहेरच दुचाकी घेऊन थांबला. तर, चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले दोघे आतमध्ये शिरले. एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात बेस बॉलची स्टीक होती. त्याचा धाक दाखवत आरोपींनी आतमधील कर्मचाऱ्यांना गप्प केले. त्यानंतर रोख रकमेबाबत विचारणा करून लुटारूंनी एक ड्रॉवर उघडला. त्यात काहीच आढळले नाही. त्यामुळे लुटारूंनी रोख रकम शोधणे सुरू केले. त्यांचे मनसुबे ध्यानात आल्यामुळे आतमधील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. एकाने दुसऱ्या कर्मचाऱ्याला १०० क्रमांकावर फोन करण्याची सूचना केली. ते ऐकून लुटारू घाबरले आणि हात हलवत पळून गेले.
दरम्यान, कर्मचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षात (१००) फोन केल्यामुळे त्याची माहिती बजाजनगर पोलिसांना कळली. पोलिसांनी लगेच धाव घेतली. त्यानंतर व्यवस्थापक मिथून रमेश भिसे (वय २९) यांच्या तक्र ारीवरून पोलीस उपनिरीक्षक कुथे यांनी गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्हीत अंधार
आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. मात्र, आरोपींनी स्कार्फ बांधल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. तर बाहेर अंधार असल्यामुळे त्यात दुचाकीचा क्र मांकही व्यवस्थित दिसत नसल्याचे पोलीस सांगतात. आरोपी नवखे गुन्हेगार असावे, त्यामुळे अवघ्या दोनच मिनिटात त्यांनी तेथून पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. बाजुचे सीसीटीव्ही आणि दिसत असलेल्या दुचाकीच्या अर्धवट क्र मांकाच्या आधारे पोलीस आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.