‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न

By admin | Published: September 8, 2016 02:29 AM2016-09-08T02:29:54+5:302016-09-08T02:29:54+5:30

महाराष्ट्रात सध्या अ‍ॅट्रॉसिटी कयद्याबाबत बरीच आरडाओरड सुरू आहे. कोपर्डीच्या नावावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Try to weaken the 'Atrocity' law | ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न

‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न

Next

रिपाइं आठवले गटाचा विरोध : थुलकर यांचा आंदोलनाचा इशारा
नागपूर : महाराष्ट्रात सध्या अ‍ॅट्रॉसिटी कयद्याबाबत बरीच आरडाओरड सुरू आहे. कोपर्डीच्या नावावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले)चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी येथे दिला.
थुलकर म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. यातील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी इतकेच नव्हे तर या प्रकरणातील चौथ्या आरोपीलाही अटक करून त्याला शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे. या घटनेबाबत सध्या मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यांची या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी आणि आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. यासोबत अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. याचा आम्ही निषेध करतो. मुळात अ‍ॅट्रॉसिटी आणि या घटनेचा कुठलाही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य केले आहे. तसे असेल तर त्यांनी कुठल्या प्रकरणात गैरवापर झाला आणि तो कुणी केला हे जाहीर करावे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अ‍ॅट्रॉसिटीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असून ती हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली. एकूणच हा सर्व प्रकार म्हणजे या कायद्याला कमजोर करण्याचाच प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री यासंदर्भात मराठा समाजातील शिष्टमंडळंना भेटणार आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो. रिपाइंचे शिष्टमंडळसुद्धा यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेईल. परंतु कुठल्याही परिस्थितीत अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे तर दूरच राहिले त्या कायद्याचा कमजोर करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत राजन वाघमारे, राजू बहादुरे, आर.एस. वानखेडे, विनोद थुल, दुर्वास चौधरी, अशोक मेश्राम, सतीश तांबे, हरीश लांजेवार, मेघराज घुटके, राजेश ढेंगरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


स्वबळावर निवडणुका लढण्याचा प्रस्ताव
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्यात याव्यात, असा प्रस्ताव रिपाइं (आठवले) विदर्भ कार्यकारिणीने पारित केला असून तो राज्य कार्यकारिणीकडे पाठविला आहे. यासंदर्भात मुंबई वगळता उर्वरित जिल्हापातळीवर तेथील राजकीय परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असेही प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी स्पष्ट केले.
यासोबतच आर.एस. वानखेडे यांची पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच पूर्व विदर्भाची आणि एकूणच सर्व जिल्ह्यांची सुद्धा नवीन कार्यकारिणी निवडली जाईल, असेही थुलकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Try to weaken the 'Atrocity' law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.