कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:56+5:302021-07-15T04:07:56+5:30

नागपूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या युवकाने साथीदारांच्या मदतीने एटीएम मशीन फोडून रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला ...

Trying to break into an ATM to pay off debts | कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Next

नागपूर : लॉकडाऊनमुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या युवकाने साथीदारांच्या मदतीने एटीएम मशीन फोडून रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला होता. बेलतरोडी पोलिसांनी ११ जुलैच्या रात्री नरेंद्रनगरात घडलेल्या या घटनेतील सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली आहे.

अभिजित सुरेश सुरुशे (२७) अयोध्यानगर, कल्पेश विष्णू रंगारी (२९) कुंजीलाल पेठ, पिंटु सुखराम हेमने (१९) शिवाजीनगर आणि एक अल्पवयीन आरोपीचा यात समावेश आहे. ११ जुलैच्या रात्री नरेंद्रनगर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना दोन आरोपीचा त्यात हात असल्याची माहिती मिळाली होती. परिसरातील सीसीटीव्हीवरुन पोलिसांनी चार आरोपी कारमध्ये आल्याची माहिती समजली. कारच्या क्रमांकाच्या आधारे पोलीस अभिजितजवळ पोहोचले. त्यानंतर खरी हकीकत समोर आली. अभिजित स्टेट बँक ऑफ इंडियात हाऊस किपींगचे काम करतो. त्याने वाहन कर्ज घेऊन कार खरेदी करुन ऑनलाईन टॅक्सी सेवेत लावली होती. लॉकडाऊनमुळे टॅक्सीचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अभिजित कर्जाचे हप्ते फेडू शकत नव्हता. कर्ज फेडण्यासाठी त्याने एटीएम फोडण्याची योजना आखली. बँकेत काम करीत असल्यामुळे अभिजितला एटीएमची माहिती होती. त्यात टॅक्सी चालक कल्पेश आणि इतर दोघांना सामील करुन घेतले. ११ जुलैला ते एटीएम फोडण्यासाठी पोहोचले. खूप प्रयत्न केल्यानंतरही एटीएम मशीन न फुटल्यामुळे ते रिकाम्या हाताने परत आले. त्यांच्याकडून इतर घटनांची माहिती मिळू शकते. त्यांच्याकडुन दुचाकीसह ६.८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया, हवालदार तेजराम देवळे, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, शैलेश बडोदेकर, मिलिंद पटले, कमलेश गणेर, बजरंग जुनघरे, प्रशांत सोनुलकर आणि कुणाल लांडगे यांनी पार पाडली.

.................

Web Title: Trying to break into an ATM to pay off debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.