मिहानमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योग आणण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 09:29 PM2018-04-11T21:29:41+5:302018-04-11T21:29:53+5:30
विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन आणि वेदतर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन आणि वेदतर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) सुरू झाला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठबळामुळे हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी वेदचे पदाधिकारी, मिहानचे उच्च अधिकारी व महाराष्ट्र शासन यांची संयुक्त बैठक मंत्रालयात झाली.
या बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी, वल्सा नायर सिंह, वेदचे विलास काळे, गोविंद डागा, देवेंद्र पारेख, नवीन मालेवार, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.
मिहानच्या मार्केटिंगसाठी सकारात्मक भूमिका
मिहानमध्ये सेक्टरनुसार प्रत्येक उद्योगाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. या सल्लागारांच्या माध्यमातून अवजड उद्योग व मोठे उद्योग येथे कसे येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. फार्मा उद्योग, संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचे उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीचे उद्योग, मोठे विदेशी उद्योग मिहानमध्ये यावेत यासाठी मार्केटिंग केले जाणार आहे. एमएडीसी, वेद, आणि शासन यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत. मंगळवारच्या बैठकीत यासंदर्भात अत्यंत सकारात्मक भूमिका उपस्थित सर्वांनी घेतली.
शिष्टमंडळातर्फे १९ एप्रिलला पाहणी
मिहानचा परिसर मोठ्या उद्योगांसाठी अत्यंत पोषक आणि उपयोगी असून येत्या १९ एप्रिल रोजी २० तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळ या परिसराची पाहणी करणार आहेत. या शिष्टमंडळात उद्योग क्षेत्रातील विदेशी तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. विदेशी उद्योगांना मिहानच्या क्षेत्रात उद्योग सुरू करण्यात अधिक रस असल्याची माहिती या बैठकीत सांगण्यात आली. दर्जेदार व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध वस्तू व साहित्याची निर्मिती करणारे उद्योग येथे यावेत हाच प्रयत्न यातून राहणार आहे.
मुंबईत रोड शो
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या उद्योगांना मिहानमध्ये आकर्षित करण्यासाठी आगामी महिन्याभरात मुंबईत एका रोड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. लवकरच या आंतरराष्ट्रीय सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.