नागपुरात सर्वात स्वस्त कॅन्सरच्या उपचारासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:49 AM2017-08-14T01:49:11+5:302017-08-14T01:49:51+5:30
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा जो सेवाभाव आहे, त्याच आधारावर ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची वाटचाल असणार आहे. केवळ सेवा हेच या संस्थेचे ध्येय, प्राथमिकता आणि ब्रीद असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा जो सेवाभाव आहे, त्याच आधारावर ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची वाटचाल असणार आहे. केवळ सेवा हेच या संस्थेचे ध्येय, प्राथमिकता आणि ब्रीद असणार आहे. देशात सर्वात स्वस्त दरात कॅन्सरवर येथे उपचार होऊ शकेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि यात आम्हाला नक्कीच यश मिळेल, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्यावतीने आऊटर हिंगणा रिंगरोड, जामठा येथे ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या प्रथम टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या संस्थेचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते झाले.
संस्थेच्या प्रथम टप्प्यांतर्गत ‘रेडिओ आॅन्कोलॉजी, रेडिओ डायग्नोस्टिक’ सेवा सुरू करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कोळसा ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सन फार्मास्युटिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सांघवी, आयटीसीचे संजीव पुरी, एस बँकेचे प्रबंध संचालक राणा कपूर, टाटा मेमोरियल ट्रस्टचे डॉ. कैलास शर्मा, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. आशा कापडिया, रेडिएशन आॅन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एस. कन्नन, महापौर नंदा जिचकार व अॅड. सुनील मनोहर उपस्थित होते. पीयूष गोयल म्हणाले, ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या रूपात एक अद्ययावत हॉस्पिटल नागपूरसह संपूर्ण मध्यभारताला मिळाले आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, नागपुरात ही संस्था ५० वर्षांपूर्वीच सुरू व्हायला हवी होती. या पूर्वीच्या सरकारने आरोग्य क्षेत्रात या संदर्भात प्रयत्न करायला हवे होते.
प्रास्ताविक डॉ. आनंद पाठक यांनी केले. संचालन मेघा दीक्षित यांनी केले तर आभार नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महासचिव शैलेश जोगळेकर यांनी मानले.
कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत जाण्याची गरज नाही
नितीन गडकरी म्हणाले, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही.
गरिबांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे लक्ष्य असावे
टाटा ट्रस्टचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा म्हणाले, मध्यभारतात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी होणे हे मध्यभारतातील कॅन्सरच्या रुग्णांसाठी चांगली बाब आहे. येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलसारखीच योग्य व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल.