कागदावर अंगठा घेऊन जमीन हडपण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:11 AM2018-06-02T11:11:46+5:302018-06-02T11:12:02+5:30
आजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांचा कागदपत्रावर अंगठा घेतल्यानंतर भागीदाराने कोट्यवधीच्या जमिनीला हडपण्याचे प्रयत्न चालविल्याची तक्रार संबंधित दिवंगत वृद्धेच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांचा कागदपत्रावर अंगठा घेतल्यानंतर भागीदाराने कोट्यवधीच्या जमिनीला हडपण्याचे प्रयत्न चालविल्याची तक्रार संबंधित दिवंगत वृद्धेच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे. देवेश चंद्रकांत वाघमारे असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते धंतोलीत राहतात.
त्यांनी बेलतरोडी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आई सुशीला चंद्रकांत वाघमारे आणि मोहम्मद इस्माईलखान उस्मानखान यांच्या संयुक्त मालकी हक्काची जमीन मौजा बेलतरोडी (खसरा क्र. १४२/ २) येथे आहे. ७ जुलै २००३ ला शेती दस्त क्र. २७३९ द्वारे सुशिला चंद्रकांत वाघमारे, मोहम्मद इस्माईल खान, चंद्रकांत विठ्ठलराव वाघमारे, पंकज चंद्रकांत वाघमारे, प्रीती चंद्रकांत वाघमारे, मुन्नवर सलताना मोहम्मद इस्माईल खान, ईरशाद खान, शादाब खान या आठ जणांच्या नावाने शेती खरेदी केली होती. त्यानंतर पुढचे व्यवहार करण्यासाठी या आठही जणांनी सहमतीने या शेतीसंबंधीच्या व्यवहाराचे आममुख्त्यार म्हणून सुशीला वाघमारे आणि मोहम्मद इस्माईल खान या दोघांना नेमले होते. काही दिवसानंतर चंद्रकांत विठ्ठलराव वाघमारे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मालकी हक्काच्या ठिकाणी त्यांचे वारसान म्हणून सुशीला वाघमारे, प्रीती, पंकज आणि देवेश चंद्रकांत वाघमारे यांची नावे यायला हवी होती. मात्र, मोहम्मद इस्माईल खान आणि शादाब खान यांनी तसे केले नाही. उलट खान यांनी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या सुशीला वाघमारे यांचा अंगठा कागदपत्रांवर घेऊन त्या आधारे ९ जानेवारी २०१८ ला रिलिज डीड स्वत:च्या नावाने करून घेतली आणि या जमिनीवर मालकी हक्क असलेल्या वाघमारे कुटुंबातील सदस्यांची फसगत केली. घोषणापत्रात खोटी माहिती खान यांनी रिलीज डीड तयार करताना केलेल्या घोषणापत्रातही खोटी माहिती दिल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. ज्यांच्या नावे या जमिनीची खरेदी केली होती, त्यातील एकाही सदस्याचा मृत्यू झाला नसल्याचे खान यांनी घोषणापत्रात म्हटले आहे. प्रत्यक्षात चंद्रकांत वाघमारे यांचा २००८ मध्येच मृत्यू झाला. तरीसुद्धा खान यांनी ते लपवून खोटी माहिती दिली. बेलतरोडी पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार नोंदवणाऱ्या वाघमारे यांनी संबंधित कागदपत्रेही पोलिसांना पुराव्याखातर दिली आहे.
फसवणूक करून एका कुटुंबाला त्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीपासून वंचित करण्याचा डाव रचणाऱ्यां खान यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही या तक्रारीतून करण्यात आली आहे. यासंबंधाने कागदपत्राची तपासणी आम्ही करीत आहोत असे बेलतरोडीचे ठाणेदार तलवारे यांनी सांगितले.