नागपूर मेट्रोची गती ताशी ९० किमीपर्यंत वाढण्यावर प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 07:01 PM2018-09-25T19:01:51+5:302018-09-25T19:02:55+5:30
एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड आॅर्गनायझेशन अर्थात ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आरडीएसओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत असून उच्चस्तरीय पथकाने ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी तपासणीला सुरुवात केली आहे. सध्या ताशी २५ किमी वेगाने धावणारी मेट्रो ताशी ९० किमी वेगाने धावणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी संशोधन डिझाईन व स्टँडर्ड आॅर्गनायझेशन अर्थात ‘आरडीएसओ’ने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आरडीएसओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी घेण्यात येत असून उच्चस्तरीय पथकाने ताशी ९० किमी वेगाने ट्रायल रन करण्यासाठी तपासणीला सुरुवात केली आहे. सध्या ताशी २५ किमी वेगाने धावणारी मेट्रो ताशी ९० किमी वेगाने धावणार आहे.
विविध मानकाअंतर्गत ‘आरडीएसओ’ चाचणी करण्यात येत आहे. उपसंचालक एस.एस. परवान यांच्या नेतृत्वातील पथकात सहा अभियंते आणि पाच तंत्रज्ञ अशा एकूण १२ सदस्यांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले असून याद्वारे मिळणारी माहिती संकलित केली जाते. ‘आॅसिलेशन ट्रायल’ ९० किमी सोबतच ५० किमी, ६५ किमी आणि ८० किमी ताशी वेगानेदेखील केली जात आहेत.
या अंतर्गत प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, रायडरशिप इंडेक्स, आपत्कालीन ब्रेक व्यवस्था यासारख्या मानकांचीदेखील चाचणी करण्यात येत आहे. या सर्व मानकाअंतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून केली जाते. गाडीत एकही प्रवासी नसताना किंवा गाडी प्रवाशांनी पूर्ण भरली असतांनादेखील मानकांचे परीक्षण ‘आरडीएसओ’ करीत आहेत. याप्रमाणे मिळालेल्या सर्व माहितीचे संकलन करून अहवाल तयार केला जाईल. या अहवालाचा सखोल अभ्यास करत पुढील रूपरेषा आखली जाईल.
यापूर्वी १२ आॅक्टोबरला ‘आरडीएसओ’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देत ताशी ९० किमी गतीने गाडी चालविण्याकरिता होत असलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. त्या पथकाने तयारीवर समाधान दर्शविल्यानंतर आता या चाचण्या घेण्यात येत आहेत.