पिस्तुलाच्या धाकावर वसुलीचा प्रयत्न
By admin | Published: March 23, 2017 02:33 AM2017-03-23T02:33:00+5:302017-03-23T02:33:00+5:30
पिस्तुलाच्या धाकावर जुगाराची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली.
स्वयंकथित युवा नेता गजाआड : माऊझर, काडतूसही जप्त
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर जुगाराची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना जरीपटका पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाचा स्वयंकथित युवा नेता (नेत्याचा पुतण्या), एक अट्टल गुन्हेगार आणि एक महाविद्यालयीन विद्यार्थी आहे.शेख तौसिफ, प्रभाकर पाठराबे आणि योगेश दिलीप सिंग अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून पोलिसांनी माऊझर आणि चार जिवंत काडतूस जप्त केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तौसिफ हा शहरातील एका काँग्रेस नेत्याचा पुतण्या असून, तो स्वत:ला युवा नेता म्हणवून घेतो. त्याने नुकतीच झालेली महापालिकेची निवडणूकही लढली आहे. निवडणुकीत पराभव झालेल्या तौसिफचा जरीपटक्यातील गारमेंट व्यवसायी तुलसी वासवानीसोबत वाद आहे. जुगार आणि सट्ट्याचे एक लाख रुपये घ्यायचे असल्याने त्याने तुलसीमागे अनेक दिवसांपासून तगादा लावला होता. मात्र, तुलसी टाळाटाळ करीत असल्याने सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास तौसिफ, योगेश आणि प्रभाकर हे तिघे तुलसीच्या शोरूममध्ये शिरले.
त्यांनी पिस्तुलाच्या धाकावर तुलसीला मारहाण करून रकमेची मागणी केली. गोंधळ वाढल्याने कुणीतरी पोलिसांना कळविले. जरीपटका पोलीस लगेच घटनास्थळी धावले.
त्यांनी आरोपींना रंगेहात पकडले.त्यांना ठाण्यात आणल्यानंतर रात्रीपर्यंथ समेटाचा प्रयत्न झाला. मात्र, यश आले नाही. वरिष्ठांच्या कानावर हे वृत्त गेल्याने जरीपटका पोलिसांनी उपरोक्त तिघांना खंडणी वसुलीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्यावर हत्यार कायद्याचेही कलम लावले.
त्यांना कोर्टात हजर करून आज २३ तारखेपर्यंत पीसीआर मिळवण्यात आल्याची माहिती जरीपटक्याचे ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांनी सांगितली.(प्रतिनिधी)