अकृषक भूखंडांच्या रजिस्ट्रीचा प्रयत्न
By admin | Published: February 6, 2017 02:09 AM2017-02-06T02:09:51+5:302017-02-06T02:09:51+5:30
तालुक्यातील सावनेर, पाटणसावंगी आणि आंगेवाडा येथे शेती अकृषक न करता तसेच व नगररचना विभागाची परवनगी न घेता भूखंड पाडण्यात आले.
तहसीलदारांमुळे प्रकार उघड : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सावनेर : तालुक्यातील सावनेर, पाटणसावंगी आणि आंगेवाडा येथे शेती अकृषक न करता तसेच व नगररचना विभागाची परवनगी न घेता भूखंड पाडण्यात आले. यातील काही भूखंडांची सावनेर येथील दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात रजिस्ट्री लावण्यात आली. त्याचवेळी तहसीलदार राजू रणवीर दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्याने हा संपूर्ण प्रकार उघड झाला. या प्रकरणी तहसीलदार रणवीर यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
राज्य शासनाने अकृषक व नगररचना विभागाची परवानगी (एनएटीपी) नसलेल्या भूखंडांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. संबंधितांनी पाटणसावंगी येथे सर्वे क्रमांक - ४१५ /ब, आंगेवाडा येथे सर्वे क्रमांक ३२७/१ व सावनेर येथे सर्वे क्रमांक १९/२ व १९/३ या शेतीवर भूखंड पाडण्यात आले असून, त्यासाठी ही शेती अकृषक करण्यात आली नाही तसेच नगररचना विभागाची परवानगीही घेण्यात आली नाही. या भूखंडांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी या भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. अधिकाऱ्यांनी या शेतांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, ही शेती एनएटीपी करण्यात आली नसल्याचे आढळून आल्याने या शेतांमध्ये पाडण्यात आलेल्या भूखंडांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, पाटणसावंगी येथील आठ, आंगेवाडा येथील पाच आणि सावनेर येथील काही भूखंडांची मंगळवारी सावनेर येथील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात रजिस्ट्री लावण्यात आली होती. या प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार राजू रणवीर यांनी लगेच दुय्यम निबंधकाचे कार्यालय गाठले. त्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला असून, रणवीर यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे तक्रार केली आहे. दुय्यम निबंधक सावनेर यांनी कृषक जमिनीचे कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांचे आदेश नसताना प्लॉटच्या दस्ताची नोंदणी करून शासनाची फसवणूक केली. (प्रतिनिधी)