दरवर्षी ७६ हजार मुलांना होतो क्षयरोग : डॉ.सुनील खापर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:55 PM2018-01-06T19:55:10+5:302018-01-06T20:01:14+5:30
भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी येथे दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाचे उप-महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी येथे दिली.
५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. खापर्डे म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘जागतिक क्षयरोग अहवाल २०१६’ नुसार, क्षयरोग रु ग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, भारतामध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये क्षयरोगाच्या रु ग्णांची संख्या २०१५ मध्ये १.७ दशलक्षवरून २.८ दशलक्षवर पोहोचली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षयरुग्णाला लवकर औषधोपचार मिळावा म्हणून केंद्र शासनाने ‘यूएटीबीसी’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. यात शासकीय रुग्णालय, ‘डॉट सेंटर’ व आता खासगी डॉक्टरकडून क्षयरोगाचे निदान करून घेतल्यावर त्याला औषध दुकानातून मोफत औषधी देण्यात येत आहे. सोबतच सर्व प्रकारच्या क्षयरोगाचे निदान करण्यासाठी ‘जीन एक्सपर्ट’ (सीबीनॅट) उपकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘एमडीआर’चे ४५ हजार रुग्ण
डॉ. खापर्डे म्हणाले, क्षयरोगाचे अनियमित औषधोपचार अथवा मध्येच औषधोपचार बंद केल्याने ‘ड्रग रेजिस्टंट’ म्हणजे औषधांना प्रतिसाद न देणारा ‘मल्टीड्रग्ज रेजिस्टंट’ (एमडीआर ) होऊ शकतो. भारतात सध्या या रुग्णांची संख्या ४५ हजार आहे, तर या औषधाचेही ‘रेजिस्टंट’ झालेल्या ‘एक्सडीआर’ रुग्णांची संख्या २-३ हजाराच्या घरात आहे. क्षयरोग कार्यक्रमात काम करणाºया डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांची सहा महिन्यातून एकदा तपासणी केली जात आहे. याशिवाय रुग्ण तपासणीच्या खोल्या हवेशीर ठेवण्याच्या, सर्वांसाठी मास्क उपलब्ध करून देण्याच्या व इतरही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. खापर्डे म्हणाले, बालकांमध्ये क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण मोठे असण्याचे कारण म्हणजे लवकर निदान न होणे हा आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार न मिळणे. लवकर निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ‘सीबीनॅट’ उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोबतच पाण्यात विरघळणारी व मुलांच्या आवडीच्या चवीची औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आहारासाठी लवकरच दरमहा विशिष्ट निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.
क्षयरोगाच्या रुग्णांना मिळणार दरमहा ५०० रुपये
डॉ. खापर्डे म्हणाले, क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे. क्षयरोगींना आवश्यक उपचारासोबतच त्यांचे योग्य पोषण व्हावे व रोग लवकर बरा व्हावा यासाठी शासनाच्यावतीने प्रत्येक क्षयरोगाच्या रुग्णाला आहार खर्च म्हणून दरमहा ५०० रुपये देण्याची योजना आहे. लवकरच याला सुरुवात होणार आहे.