फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयवादाचा कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2023 09:39 PM2023-04-14T21:39:54+5:302023-04-14T21:42:01+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले.

Tug of war between Fadnavis-Raut | फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयवादाचा कलगीतुरा

फडणवीस-राऊतांमध्ये रंगला श्रेयवादाचा कलगीतुरा

googlenewsNext

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरच्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळाले. या कन्व्हेंशन सेंटरची संकल्पनाच आपली असून मंत्री असताना याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले. तर यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री असताना या कामासाठी ८० कोटी दिले व आता पुन्हा १५ कोटी दिल्याचे सांगत ‘राऊत साहेब थोडे श्रेय आम्हालाही द्या’, असा टोला लगावला.

उत्तर नागपुरातील कामठी रोडवर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटात लोकार्पण झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, माजी मंत्री नितीन राऊत, प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री राजकुमार बडोले, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, माजी आ. डॉ. मिलिंद माने, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातील कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवा, अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणी चांगली संकल्पना मांडली की आम्ही स्थगिती देत नाही, असे सांगत या कन्व्हेंशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी आणखी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सोबत या सेंटरच्या मेन्टनन्ससाठी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाऊंडेशनसोबत करार करणार असल्याचेही सष्ट केले. उत्तर नागपूरच्या विकासाला आम्ही पाठबळ देऊ, अशी हमीही दिली.

 

डॉ. आंबेडकर रुग्णालय उत्तर नागपुरातच होणार : फडणवीस

- उत्तर नागपुरात उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र दुसरीकडे नेऊ नका, अशी मागणी यावेळी नितीन राऊत यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या हॉस्पीटलचा प्रस्ताव ‘पीपीपी’ तत्वावर होता. त्यामुळे येथील जनतेला दर परवडले नसते. त्यामुळे आता राज्य सरकार या प्रकल्पासाठी लागणारा सर्व पैसा देईल व हे हॉस्पीटल येथेच होईल, अशी हमी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

राऊत समर्थकांची घोषणाबाजी

- या कन्व्हेंशन सेंटरचे जनक राऊत असल्याचे सांगत लोकार्पणापूर्वी नितीन राऊत समर्थकांनी जोरदार घोषणा केली. पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही घोषणाबाजी सुरू होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राऊत हे मंचावर येताच समर्थक शांत झाले.

उत्तर नागपुरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंटचे करणार : गडकरी

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर नागपुरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंटचे करणार असल्याची घोषणा केली. या संपूर्ण परिसरात ऑक्टोबर नंतर २४ तास पाणी मिळेल, असेही त्यांनी स्पष केले. हे कन्व्हेंशन सेंटर कुठल्याही लग्न किंवा रिसिप्शनसाठी दिले तर मी सर्वप्रथम विरोध करील, असेही त्यांनी नासुप्र सभापतींना बजावले.

Web Title: Tug of war between Fadnavis-Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.