दुकानदारांना चाचणी बंधनकारकचा निर्णय तुघलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:04 PM2020-08-13T23:04:21+5:302020-08-13T23:07:08+5:30
नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील सर्व दुकानदार आणि तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.
दुकानदार व कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत चाचणी करायाची आहे. त्यानंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास महापालिकेतर्फे कारवाई करीत दुकान बंद करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. नागपूर शहरात ५० हजार व्यापारी आहेत. त्यांच्याकडील कर्मचारी गृहित धरता ही संख्या पाच लाखांवर जाते. शहरात दररोज तीन हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत १८ तारखेपर्यंत पाच लाख लोकांची चाचणी कशी करणार? यासाठी एका दिवशी ८० हजार तपासण्या कराव्या लागतील आणि यावर जवळपास ८० कोटी रुपये खर्च येईल. आजच्या परिस्थितीत हे शक्य नसल्याने आयुक्तांनी घेतलेला निर्णय तुघलकी व अव्यवहार्य असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.
एनजीओची मदत घेणार
कोरोना रुग्णांची वाढती संख्या व संसर्ग विचारात घेता मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवरील भार वाढला आहे. यंत्रणा कोलमडण्याकडे वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील एनजीओची मदत घेण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.
व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुकानदार आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. व्यवसाय करून १८ ऑगस्टपर्यंत चाचणी कशी करायची, अशी चर्चा गुरुवारी व्यापाऱ्यांमध्ये होती.
मनपाने झोननिहाय २२ चाचणी केंद्र सुरू केले आहेत. त्या ठिकाणी मोफत चाचणी होणार आहे. याशिवाय खासगी लॅबमध्ये अॅन्टिजन चाचणीसाठी ७०० रुपये खर्च येणार आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुकानात येणारे ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह आहेत वा नाही, याची माहिती दुकानदारांना नसते. पण स्वत:ला आणि कर्मचाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय कोरोनामुक्त राहतील. त्यामुळे व्यापाऱ्यांना निर्भीडपणे व्यवसाय करणे शक्य होणार आहे. ही दूरदूष्टी ठेवूनच मनपा आयुक्तांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. पुढे आदेश काढल्यानंतर अडचणी उद्भवू नये म्हणून दुकानदारांनी आताच स्वत:हून कोरोना चाचणी करावी, असे आवाहन बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केल्याचे अश्विन मेहाडिया यांनी सांगितले. १८ ऑगस्टपर्यंत व्यापाऱ्यांनी चाचणी केलेली नाही, असे आढळून आल्यास पुढे आयुक्त चाचणीचा कठोर आदेश काढू शकतात. तेव्हा व्यापाऱ्यांसाठी ही बाब अडचणीची ठरणार असल्याचे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.
नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन महासचिव ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, चेंबरच्या अध्यक्षांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना चाचणी करायची की व्यवसाय, हा प्रश्न उभा राहिला आहे. दुकानदारांना आदेश देऊन काहीही होणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन आयुक्तांनी काम करावे. आपले आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंब कोरोनामुक्त ठेवण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांची आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्याची सूचना करावी, आदेश काढू नये. यासंदर्भात असोसिएशन आणि कॅट नागपूरचे पदाधिकारी मनपा आयुक्तांची भेट घेणार आहे.