तुकाराम मुंढे; वाद पेटला; माफी मागा अन्यथा पोलिसात तक्रार करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:05 PM2020-08-29T13:05:50+5:302020-08-29T13:06:13+5:30
माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही महिलांनी कपडे फाडून आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. यावर भाजपच्या महिला नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे.
भाजपचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मुंढे यांच्यासोबत जी घटना घडली त्याची वेळ व स्थळ कोणते होते याची घोषणा करावी. किती महिलांनी कपडे फाडले त्यांची संख्याही सांगायला हवी. आयुक्तांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले जाते. त्यांची नावेही जाहीर करायला हवी. ते आयएएस अधिकारी आहेत. अशी घटना घडल्यावर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता. इतके दिवस ते गप्प का राहिले. त्यांचे आॅफिस व घरातही सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यांनी त्याचे फुटेजही जारी करायला हवे. जर मुंढे हे सर्व पुरावे देण्यास अपयशी राहिले तर स्पष्ट होईल की, त्यांच्या वक्तव्याला कुठलाही आधार नाही. केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिला जातीचेच चारित्र्यहनन झाले आहे. २४ तासात मुंढे यांनी पुरावे द्यावे अन्यथा भाजपच्या महिला आघाडी व महिला नगरसेवकांतर्फे तक्रार दाखल केली जाईल. यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, प्रतोद दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.
मग तेव्हा गप्प का राहिले मुंढे
मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. ज्या घटनेचा उल्लेख मुंढे यांनी केला आहे, त्याचे नावही त्यांनी सांगावे, अन्यथा माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसात तक्रार दाखल करू. घटना घडली तेव्हा ते बोलले का नाही. इतके दिवस गप्प का राहिले. बदली झाल्यावरच का आठवले. मुंढे हे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी या घटनेची तात्काळ तक्रार करायला हवी होती. मुंढे यांचे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे.
संदीप जोशी, महापौर