तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले; नितीन गडकरी यांची केंद्राकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:31 AM2020-07-01T01:31:35+5:302020-07-01T01:31:51+5:30
कठोर कारवाई करण्याची मागणी
नागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) ‘सीईओ’पद बळकावले असल्याची गंभीर तक्रार गडकरी यांनी केंद्राकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी तसेच केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांना पत्र लिहिले आहे. मुंढे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी ‘एसव्हीपी’ची (स्पेशल पर्पज व्हेईकल) निर्मिती केली असून, याचे नेतृत्व पूर्णकालीन ‘सीईओ’ करेल अशी तरतूद आहे. यात केंद्र व राज्य शासनाच्या नामनिर्देशित सदस्यांचादेखील समावेश असतो. २०१३ च्या कंपनी अॅक्टनुसार ‘एनएसएससीडीसीएल’ची नोंदणी झाली असून, नागपूर मनपा व राज्य शासनाची ही संयुक्त कंपनी आहे.
केंद्र शासनाकडून अनुदानित ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला नुकसान पोहोचविण्याचा मुंढे यांचा मानस पूर्ण होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
परदेशींना ‘सीईओ’ नियुक्तीचे अधिकारच नाही
बेकायदेशीररीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे ‘सीईओ’पद बळकावणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी आपली नियुक्ती केल्याचा दावा प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार परदेशी यांना चेअरमन या नात्याने ‘एनएसएससीडीसीएल’च्या ‘सीईओ’ची नियुक्ती करण्याचे अधिकारच नाहीत. तो अधिकार केवळ कंपनीच्या संचालक मंडळाकडे आहे, असे नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.