...अन् तुकाराम मुंढे तडक सभागृहातून निघून गेले, मनपा इतिहासात असे पहिल्यांदाच घडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 03:04 PM2020-06-20T15:04:12+5:302020-06-20T15:44:34+5:30
शनिवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध मुद्यावरून आयुक्तांना धारेवर धरले. काही नगरसेवकांनी व्यक्तिगत टीका केली. यामुळे नाराज झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून नगरसेवक व पदाधिकारी यांना भेट देत नाही, विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्यावरून वाद सुरू आहे. त्यात शनिवारी सर्वसाधारण सभेत आयुक्त लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचे हनन करीत असून हुकूशमशाही कारभार करीत असल्याचा आरोप करीत सत्ताधाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. यामुळे आयुक्त महापौरांची परवानगी न घेता सभागृहातून रागारागाने निघून गेले. महापौर संदीप जोशी यांनी त्यांना लोकशाही व जनहित लक्षात घेता सभागृहात परत बोलवण्याचा प्रयत्न केला. अपर आयुक्त राम जोशी यांनीही त्यांना फोन केला परंतु मुंढे आले नाही. त्यानंतर मंगळवारपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार तीन महिन्यानंतर मनपाची सर्वसाधारण सभा रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स राहील अशी व्यवस्था करण्यात आली होती. महापौर संदीप जोशी यांनी सभागृहात कामकाजाला सुरुवात केली. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी त्यांच्या प्रभागातील के.टी.नगर येथील मनपा रुग्णालयाच्या बाजुला व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या वापरात बदल करण्याला सभागृह व राज्य सरकारची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आणले. दुसºयाला नियम सांगणारे आयुुक्त कोरोनात ३०० लोकांना मार्गदर्शन करतात. आयुक्तांचा लोकशाहीवर विश्वास नाही का असा सवाल ग्वालबंशी यांनी केला.मनपा हॉस्पिटलच्या बाजुला असलेल्या इमारतीचा वापर केला. यावरून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आयुक्त सभागृहात चुकीची माहिती देत असल्यावरून पॉईंट ऑफ इन्फर्मेशन उपस्थित केला. आमदार व नगरसेवक प्रवीण दटके यांनी आयुक्तांना धारेवर धरले. यावर सभागृहात असेच चालू राहीले तर मी सभागृहात थांबणार नाही. असे आयुक्तांनी महापौरांना सांगितले.
आयुक्तांचे उत्तर चुकीचे असेल तर दुरुस्तीसाठी पॉईंट ऑफ इन्फर्मेशन विचारण्याचा अधिकार सदस्यांना आहेत. नियमा प्रमाणे चालायचे नसेल तर मुख्यमत्र्यांना सांगून मुंबईला जा असे तिवारी म्हणाले. हरीश ग्वालबंशी यांनी आयुक्त हुकूमशहा आहे. एक संत तुकाराम झाले. अन् पुढे बोलणार तोच मुंढे सभागृहातून तावातावाने निघून गेले. मनपा इतिहासात आयुक्तांनी सभागृहातून निघून जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
सन्मान होत नसलेल्या सभागृहात येणार नाही : मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेल्याने महापौरांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले. दरम्यान अपर आयुक्त राम जोशी यांनी मुंढे यांच्याशी संपर्क साधला . परंतु ‘ज्या सभागृहात आयुक्तांचा मान राखला जात नाही. तेथे यायचे नाही’ असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती सभागृहात राम जोशी यांनी दिली.
आयुक्तांनी सभागृहात यावे : महापौर
पदाधिकारी, विरोधीपक्ष नेते व नगरसेवक यांनी आयुक्तांशी समन्वय ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ३-३ तास कक्षापुढे उभे ठेवतात. सभागृहात आयुक्तांच्या वागणुकीवर रोष व्यक्त करण्यात आला. असे असूनही मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे. जनतेशी संबंधित मुद्दे निकाली काढावे. असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
उत्तर देण्याची जबाबदारी आयुक्तांची
सभागृहाचे कामकाज नियम व परंपरेने चालते. काम करताना काही चुका होतात. लोकशाहीत सभागृह सर्वोच्च आहे. नगरसेवक लोकहिताचे प्रश्न मांडतात. सभाग्हात वाद विवाद होत असतात. मते भिन्न राहू शकतात. व्यक्तीगत टिप्पनी योग्य नाही. पण त्यामाील नगरसेवकांची भूमिका समजून घेतली पाहिजे. आयुक्तांनी सभागृह सोडून जाण्याटचा प्रकार दुदैवी आहे. प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. यामुळे शहराचे नुकसान होईल. काँगे्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले.
मुंढे इव्हेंन्ट म्हणून काम करतात
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच दयाशंकर तिवारी यांनी मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आचार संहतेचा मुद्दा उपस्थित केला. एखाद्या व्यक्तीला सुुनावणीसाठी बोलावल्यास त्याच्याच समर्थनात नारे लागत असतील तर काय कारवाई करणार? असा सवाल प्रवीण दटके यांनी केला. शिस्तर्भग केला असेल तर कारवाई होईल, असे मुंढे यांनी यावर उत्तर दिले. यावर तिवारी म्हणाले, सभागृहाबाहेर लोक गोळा करून नारे लावण्याचा विषयात आयुक्त स्वत: ला शिक्षा देवू शकत नाही. आयुक्त नागपूरला अधिकारी म्हणून नव्हे तर इव्हेंन्ट म्हणून आलेले आहेत. दुसरीकडे गैरप्रकार व भोंगळ कारभार सुरू आहे.