तुकाराम मुंढे यांचे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:48 PM2020-04-11T20:48:47+5:302020-04-11T20:49:12+5:30
घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोव्हिड-१९ हा नागरिकांच्या जीवावर उठलेला या शतकातील भयानक विषाणू आहे. त्याविषयी सर्वप्रथम जाणून घ्या. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या. शासनाच्या निर्देशाचे पालन करा. घरीच राहा आणि कोरोनाशी योद्धा बनून लढा द्या, सामाजिक अंतर पाळा, अत्यावश्यक कामाकरिताच घराबाहेर पडा. लवकर घरी जा. घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
कोव्हिड-१९ बद्दल आजही बहुतांश नागरिकांना नेमकी माहिती नाही. त्याची उत्पत्ती, त्याचा प्रसार, त्याची भयावहता, त्याचे गांभीर्य, त्यावरील उपाययोजना आदींबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे तुकाराम मुंढे यांनी समाधान केले. लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळीच उपचार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वारंटाईन व्हा आणि समाजाला आपल्यापासून धोका होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पूर्वी मास्क वापरण्याची गरज नाही, असे सांगितले गेले मात्र नंतर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले, असे का या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, राज्यात कोरोनाने जेव्हा शिरकाव केला तेव्हा त्याची तीव्रता कमी होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य शासन वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. पूर्वी शासनाच्या निर्देशानुसार मास्क प्रत्येकाने वापरणे बंधनकारक नव्हते. मात्र, आता कोरोनाचा प्रसार आणि वाढती रुग्णसंख्या बघता आपल्यापासून दुसऱ्याला आणि इतरांपासून आपल्याला रोग होऊ नये, ही काळजी घेण्यासाठी शासनानेच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.