तुकाराम मुंढे यांचा दणका : वोक्हार्ट व सेव्हन स्टारने परत केले रुग्णांचे १०.५० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:44 PM2020-08-13T22:44:41+5:302020-08-13T22:47:45+5:30
शहरातील वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलने कोविड-१९ बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावली व रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वोक्हार्ट हॉस्पिटलने ९.५० लाख तर सेव्हन स्टार हॉस्पिटलने १ लाख रुपये रुग्णांना परत केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलने कोविड-१९ बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावली व रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वोक्हार्ट हॉस्पिटलने ९.५० लाख तर सेव्हन स्टार हॉस्पिटलने १ लाख रुपये रुग्णांना परत केले आहेत. कोणत्याही खासगी रुग्णालयाने कोविड रुग्णांकडून आकारलेले जास्तीचे पैसे परत करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
कोविड रुग्णांकडून वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटल अतिरिक्त शुल्क वसूल करीत असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन्ही हॉस्पिटलना नोटीस बजावून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. वोक्हार्ट व्यवस्थापनाकडून कुठलेही उत्तर सादर करण्यात न आल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट रुग्णालयाला दणका देत रुग्णांकडून लाटलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा, महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा दिल्यानंतर वोक्हार्ट व्यवस्थापनाकडून रुग्णांकडून अतिरिक्त शुल्काच्या नावावर घेण्यात आलेले ९.५० लाख रुपये परत करण्यात आले. तर सेव्हन स्टार हॉस्पिटलने १ लाख रुपये परत केले.
महाराष्ट्र सरकारकडून कोविड रुग्णांसाठी आकारण्यात येणाºया शुल्काबाबत नियमावली जारी केली आहे. ही नियमावली खासगी रुग्णालयात पाळण्यात येत आहे की नाही, हे तपासणीसाठी महापालिकेकडून अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले आहे. पथकाकडून काही दिवसांपूर्वी वोक्हार्ट पाठोपाठ सेव्हन स्टार हॉस्पिटलची आकस्मिक पाहणी केली होती. येथील रेकॉर्ड तपासण्यात आले. यातून सेव्हन स्टार हॉस्पिटलकडून शासन व महापालिकेच्या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे पुढे आले होते. मुंढे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. २४ तासात आपल्याविरोधात महामारी कायदा, आपत्ती व्यवस्थापन आवश्यक सेवा कायदा मुंबई नर्सिंग होम कायद्यांतर्गत कारवाई का करू नये, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. दोन्ही रुग्णालयांकडून २४ तासात उत्तर देण्यात आले नव्हते. त्यानंतर मनपा आयुक्तांकडून हॉस्पिटलवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
सेव्हन स्टारवर कारवाई होणार
सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रुग्णांकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात आले आहे. या रुग्णांची संख्या जवळपास एक हजार आहे. त्यांच्याकडून जवळपास २५ लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याची शक्यता मनपा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नियमांची केली पायमल्ली
वोक्हार्ट व सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाकडून रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरफलक लावण्यात आलेला नव्हता. ८० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आलेले नव्हते. रुग्णांकडून अधिकचे शुल्क जमा करून घेतले जाते. परंतु डिस्चार्ज देताना ही रक्कम रुग्णांना परत केली जात नाही. याशिवाय अनेक बाबतीत रुग्णालयात अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यानंतर, आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दोन दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.