तुकडोजी महाराज हे गाडगेबाबांचे अनुयायी! अशोक राणा यांच्या प्रकरणावरून पडली ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:41 PM2020-12-17T12:41:19+5:302020-12-17T12:42:52+5:30
Nagpur News ‘शब्दसाधना या पुस्तकाच्या गद्य विभागात अशोक राणा यांनी लिहिलेल्या पाचव्या प्रकरणात तुकडोजी महाराजांना गाडगेबाबांचे अनुयायी संबोधण्यात आले आहे.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाणिज्य प्रथम वर्षासाठी मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक ‘शब्दसाधना : भाग - १’ प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या गद्य विभागात अशोक राणा यांनी लिहिलेल्या पाचव्या प्रकरणात तुकडोजी महाराजांना गाडगेबाबांचे अनुयायी संबोधण्यात आले आहे. त्यावरून नव्या वादाला ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुस्तकाच्या पान क्रमांक ३९ ते ४७ मध्ये प्रसिद्ध साहित्यिक अशोक राणा यांचे ‘समतेचे वारकरी : संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांचे अल्प जीवनचरित्र मांडण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणावरून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासोबतच, दोन्ही महापुरुषांचे चरित्रगायन करताना स्वत:चे विचार लादल्याचाही आरोप केला जात आहे. याच प्रकरणात पान क्रमांक ४२वर त्यांनी कीर्तनप्रकारांची मांडणी करताना वारकरी, पुणेरी व रामदासी असे तीन प्रकार मांडले आहेत. विशेषत: पुणेरी असा कोणताच प्रकार नसून तो नारदीय आहे. ते पूर्वग्रहदूषित असल्यानेच त्यांनी नारदीय ऐवजी कीर्तनासाठी पुणेरी असा शब्दप्रयोग करून जातीय द्वेष व्यक्त केल्याचाही आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे.
* प्रकरणाचा संदर्भही नाही
पाठ्यपुस्तकात कोणत्याही लेखकाचा धडा घेताना, त्या धड्याचे संदर्भ पुस्तक देणे गरजेचे असते. मात्र, ‘समतेचे वारकरी : संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या प्रकरणाचा संदर्भ पाठ्यपुस्तकात देण्यात आलेला नाही. या संदर्भात अशोक राणा यांनी विद्यापीठाच्या भाषा मंडळावर नाराजी व्यक्त केली असून, हे प्रकरण एका दैनिकातील विशेषांकातून घेण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
* तुकडोजी महाराज हे गाडगेबाबा किंवा महात्मा गांधींचे अनुयायी होते, हे साफ खोटे आहे. असे लिहिणे हा खुळचटपणा आहे. स्वत: तुकडोजी महाराजांनी गाडगेबाबांची प्रकृती खालावली असताना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. महात्मा गांधी यांच्यावरील प्रेमापोटी लिहिलेल्या कवनांतही ना गांधी माझे ना मी गांधीचा शिष्य आहे, असे तुकडोजी महाराजांची स्पष्ट करून ठेवले आहे.
- ज्ञानेश्वर रक्षक, गुरुदेव सेवा मंडळ
* तुकडोजी महाराज हे गाडगेबाबांचे अनुयायी म्हणणे हा राष्ट्रसंतांच्या अनुयायासाठी वादविवादाचा विषय ठरतो. मात्र, गाडगेबाबा हे तुकडोजींपेक्षा वयाने मोठे होते आणि ते चांगले मित्रही होते. प्रभाव असल्याने अनुयायी म्हटले तर बिघडले कुठे. नेमका असाच वाद महात्मा गांधी यांना तुकडोजी महाराजांचे गुरू म्हटल्यावरही होतो. मात्र, महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव राष्ट्रसंतांच्या अनेक साहित्यावर व समाजकार्यावर दिसून येतो. त्यामुळे, असा वादविवाद करणे मूर्खपणाचे आहे.
- अशोक राणा, साहित्यिक, यवतमाळ
........