प्रजासत्ताक दिनी देशभर निनादणार राष्ट्रगीताचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:02+5:302021-01-23T04:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत’ या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘हर घर तिरंगा, हर घर राष्ट्रगीत’ या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. ‘एक वादळ भारताचं’ या चळवळीच्या माध्यमातून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. नागपूर विदर्भासह, महाराष्ट्र, मध्य प्रदेश छत्तीसगड व गुजरात या राज्यातील ८५ पेक्षा जास्त ठिकाणांवर हा कार्यक्रम पार पडेल.
राष्ट्रगीत व राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे संवैधानिक कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेचे जागरण करण्यासाठी पाच वर्षापूर्वी एक वादळ भारताचं ही चळवळ सुरू करण्यात आली. राष्ट्रीय सणांच्या दिवसांचा उपयोग केवळ सुटीसाठी न होता राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मानाचा दिवस व्हावा व मनामनात राष्ट्रभावना वृद्धिंगत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे या अभियानाचे मुख्य समन्वयक वैभव शिंदे पाटील यांनी म्हटले आहे. शालेय विद्यार्थी व नोकरदार यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र गृहिणी, ज्येष्ठ नागरिक व इतरांना यापासून वंचित रहावे लागते. हेच ओळखून ही चळवळ सुरू करण्यात आली. दरवर्षी सार्वजनिकरीत्या हा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोविडच्या प्रकोपामुळे शासन प्रशासनाकडून जी बंधने घालून देण्यात आली आहे त्यांचे पालन करून नागरिकांनी आपापल्या घरी अंगणात, घराच्या छतावर, सोसायटीत, गल्ली व वस्तीत ध्वजारोहण करुन राष्ट्रगीताचे गायन करावे असे आवाहन एक वादळ भारततर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता एकाच वेळी राष्ट्रगीताचे गायन होणार आहे.