विमानतळावर व्हीआयपी पार्किंग व्यवस्था बंद करा
By admin | Published: May 4, 2017 02:24 AM2017-05-04T02:24:03+5:302017-05-04T02:24:03+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी पार्किंग पूर्णपणे बंद करण्याची मागणी करणारे
व्हीटीएची मागणी : मुळेकर यांचे आश्वासन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी पार्किंग पूर्णपणे बंद करण्याची मागणी करणारे निवेदन विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनने (व्हीटीए) मिहान इंडिया लिमिटेडचे (एनआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांना दिले.
विमानतळावर असुविधाजनक पार्किंग व्यवस्थेसंदर्भात पाठपुरावा करताना व्हीटीएने यापूर्वी निवेदन दिले होते. ही बाब गांभीर्याने घेत एमआयएलने विमानतळावर १५ एप्रिलपासून प्रवाशांसाठी नवीन पार्किंग व्यवस्था लागू केली आहे. व्यवस्थेची व्हीटीएने प्रशंसा केली आणि त्यात आणखी सुधारणा करण्याची मागणी केली.
व्हीटीएचे अध्यक्ष शर्मा म्हणाले, काही दिवसात विमानतळाच्या पार्किंगमध्ये सुधारणा झाली असून त्यात आणखी सुधारणांची गरज आहे. नागपुरातून चेन्नई व जयपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लवकरच विमानसेवा सुरू करावी.
व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी सांगितले की, नवीन पार्किंग प्रणालीनुसार आपातकालीन लेन विमानतळाच्या इमारतीजवळ आहे. ही सुविधा उत्तम आहे. पण अनेकदा व्हीआयपी या लेनचा उपयोग करताना दिसतात. आता नवीन प्रणाली पर्याप्त लेनसह उपलब्ध आहे. त्या ठिकाणी व्हीआयपी कार अतिथींची वाट पाहू शकतात. यामुळे आपातकालीन क्षेत्रात प्रत्येक प्रवाशांवर सक्तीने प्रतिबंध लावले पाहिजे. या क्षेत्राचा उपयोग केवळ सुरक्षा, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन आदींसाठी व्हावा.
रेणू म्हणाले, जनरल पिकअप आणि ड्रॉप क्षेत्र सर्वाधिक विवादित आहे. कारण त्याची वेळ केवळ पाच मिनिटे आहे. अनेकदा प्रवाशांना बाहेर निघताना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जनरल पार्किंग क्षेत्रातून व्हीआयपी लेन बंद करावी.
मुळेकर यांनी व्हीटीएच्या सूचनांची प्रशंसा केली आणि पिकअप व ड्रॉप क्षेत्रातून बाहेर निघताना एकीकडे बॅरिकेट्स लावण्यात येईल आणि जनरल पार्किंगमधून व्हीआयपी लेन बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
चर्चेदरम्याान व्हीटीएचे कार्यकारिणी सदस्य अमरजीत सिंह चावला व साकिब पारेख, एमआयएलचे महाव्यवस्थापक आबीद रुही, वरिष्ठ व्यवस्थापक (एपी अॅण्ड सी) सूरज शिंदे आणि सुरक्षा व्यवस्थापक यशवंत सातरकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)