तुषार कांति भट्टाचार्य अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:47 AM2017-08-09T01:47:57+5:302017-08-09T01:48:20+5:30

नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार कांति भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.

Tushar Kanti Bhattacharya detained | तुषार कांति भट्टाचार्य अटकेत

तुषार कांति भट्टाचार्य अटकेत

Next
ठळक मुद्देनक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशय : गुजरात पोलिसांची धावत्या रेल्वेत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नक्षल चळवळीत सक्रिय असल्याच्या संशयावरून शहरातील रहिवासी तुषार कांति भट्टाचार्य यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. कोलकाता येथे राहणाºया बहिणीला भेटून नागपूरकडे परत येत असताना गुजरात पोलिसांनी गोंदियाजवळ धावत्या रेल्वेगाडीत भट्टाचार्य यांना अटक केली. त्यांना नंतर नागपुरात आणून विमानाने अहमदाबादला नेण्यात आले.
बुधवारी त्यांना सुरतच्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुजरात पोलिसांनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप भट्टाचार्य यांच्या आप्तजनांनी लावला आहे. या कारवाईची आम्हाला सूचनाही देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भट्टाचार्य यांच्या विरुद्ध गुजरात पोलिसांनी २०१० मध्ये नक्षली चळवळीचा प्रचार करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.
परंतू, भट्टाचार्य हैदराबादमध्ये शिकत असताना १९७० मध्ये ते विद्यार्थी आंदोलनात सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात भट्टाचार्य यांच्यावर २००७ मध्ये कोर्टात केस दाखल झाली.
सुनावणी दरम्यान २००८ ते २०१३ पर्यंत ते आंध्रप्रदेशातील चेरलापल्ली कारागृहात बंद होते. ते कारागृहात बंदिस्त असतानाच २०१० मध्ये गुजरात पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला अन् त्यांना फरारही घोषित केले. त्यामुळे खुद्द भट्टाचार्य यांनी ९ मे २०११ आणि २२ जुलै २०११ ला सूरत न्यायालयाला पत्र लिहून आपण फरार नाही, कारागृहात आहो, अशी माहिती दिली होती. दरम्यान, २०१३ मध्ये सर्व प्रकरणातून मुक्तता झाल्यामुळे आंध्रप्रदेशातील कारागृहातून बाहेर आल्यानंतर भट्टाचार्य नागपुरातील निवासस्थानी राहू लागले.
निर्वाहासाठी ते प्रसारमाध्यमात अधूनमधून लेख लिहीत असल्याचे कुटुंबीय सांगतात. असे असताना गुजरात पोलिसांनी त्यांना अटक केली.

माझ्या पतीचे अपहरण
शोमा सेन यांचा आरोप
मंगळवारी सकाळी ५.४५ ला झालेल्या या कारवाईची माहिती कळाल्यानंतर भट्टाचार्य यांच्या आप्तस्वकीयांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या संबंधाने मंगळवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत तुषार कांति भट्टाचार्य यांची पत्नी नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख प्रा. शोमा सेन यांनी म्हटले की, २०१३ मध्ये कारागृहातून मुक्तता झालेल्या भट्टाचार्य यांना तब्बल चार वर्षांनंतर अटक करण्याची गरज गुजरात पोलिसांना का भासली. त्यांना कथित आरोपांमध्ये अटकच करायची होती, तर पोलीस त्यांच्या घरी का आले नाहीत, असा प्रश्नही सेन यांनी केला. अशा प्रकारे रेल्वेतून पोलिसांनी अपहरण करणे योग्य नाही. त्यांच्या क्रांतिकारी लिखाणामुळे घाबरून सरकारने ही डावबाजी केली आहे. बनावट प्रकरणे उघडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने त्यांच्या जमानतीचा प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला वीरा साथीदार होते. अशा प्रकारे त्रास देऊन त्यांना घाबरवले जात असल्याचे वीरा साथीदार म्हणाले. ं
 

Web Title: Tushar Kanti Bhattacharya detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.