बारावीच्या निकालाने विद्यार्थ्यांची उडविली झोप; शिक्षक म्हणतात ‘डोन्ट वरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 10:39 AM2021-07-19T10:39:26+5:302021-07-19T10:44:25+5:30
Nagpur News अकरावीकडे बहुतांश विद्यार्थी रेस्ट इयर म्हणून बघत असतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून, शिक्षक मात्र विद्यार्थ्यांनो काळजी करू नका असे सांगताहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या निकालाचे सूत्र ३०-३०-४० असे ठरले आहे. म्हणजेच दहावी ३० टक्के, अकरावी ३० टक्के व बारावीचे ४० टक्के असे गुणदान विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. अकरावीकडे बहुतांश विद्यार्थी रेस्ट इयर म्हणून बघत असतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून, शिक्षक मात्र विद्यार्थ्यांनो काळजी करू नका असे सांगताहेत.
बारावीच्या निकालासाठी बोर्डाने मूल्यांकनाचा दिलेल्या फार्म्युल्यानुसार दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याचा आमच्या गुणांवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. या फाॅर्म्युल्यानुसार अकरावी विद्यार्थ्यांचा घात करेल असे त्यांना वाटते आहे. तज्ञांच्या मतेही विज्ञानाचे ९० टक्के व कला व वाणिज्य शाखेचे ५० टक्के विद्यार्थी अकरावीला ‘रेस्ट इयर’ म्हणून बघतात. त्यांना अकरावीच्या निकालाचे फार महत्त्व नसते. त्यामुळे गुण कमी होतात. पण कोरोनामुळे बोर्डाने घेतलेला निर्णय शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही मान्य करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक ज्युनि. कॉलेजच्या अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. बारावीचेही कोरोनामुळे वर्ग झालेले नाहीत. ग्रामीण भागात अथवा स्लममधील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण येईल, अशी भीती विद्यार्थ्यांना आहे. पण अकरावी व बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी करू नका, असा सल्ला दिला आहे. दहावीसारखाच बारावीचाही निकाल लागले, विद्यार्थ्यांना चांगलेच गुण मिळतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
- विभागातील बारावीचे विद्यार्थी
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडे एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी - १४६९९१
नागपूर विभागातील सीबीएससी बोर्डात एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी - १८६५३
- विद्यार्थी काय म्हणतात
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तो बारावीची तयारी करतो. त्यासाठी अकरावीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळे गुणांवर परिणामही होतो; पण बारावीत विद्यार्थी कसून मेहनत घेतो. अनेक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे; पण बोर्डाने दिलेल्या फाॅर्म्युलामुळे आमचे नुकसान होणार अशी खात्री आहे.
सम्यका गजघाटे, विद्यार्थिनी
- आम्ही अकरावीत असताना कोरोना आला. त्यामुळे अकरावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. बारावीत चांगले गुण मिळतील या अपेक्षेने मेहनतही घेतली; पण कोरोनामुळे परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे; पण आता पर्याय नाही.
तनु पाटील, विद्यार्थिनी
- शिक्षक काय म्हणतात
- फाॅर्म्युल्यानुसार दहावीतील बेस्ट ऑफ ३ ची सरासरी घ्यायला सांगितले. त्यानुसार दहावीत ज्या मुलाला ६० टक्के असेल आणि ३ विषयात चांगले गुण असेल तर त्याच्या गुणाची सरासरी ७० टक्केवर जाईल. दहावीच्या गुणांच्या सरासरी आधारावर बारावीचे मूल्यांकन करायचे आहे. त्यामुळे बारावीत विद्यार्थ्यांचे गुण कमी न होता वाढणारच आहे.
मनोज हेडाऊ, प्राध्यापक
- बहुतांश विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर म्हणून बघतात. पण कोरोनाने विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष महत्वाचे असल्याचे दाखवून दिले आहे. मंडळाने दिलेल्या फार्म्युल्यानुसार अकरावीच्या गुणालाही महत्व आले आहे. विद्यार्थी नापास होणार नाही, पण अकरावीच्या गुणांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर काहीसा परिणाम होईल.
राहुल गौर, प्राध्यापक
- सीबीएसई बोर्डाच्या निकालाचेही मूल्यांकन स्टेट बोर्डासारखे करायचे आहे. पण सीबीएससीचा विद्यार्थी अकरावीत नियमित शाळेत आला. बारावीचे ऑनलाईन वर्गही त्याने नियमित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलेच गुण मिळणार आहे. उलट जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत होते, त्यांना यावर्षी फायदा होणार आहे. सीबीएसईच्या हुशार विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळतील.
शन्मुख ठाकरे, प्राध्यापक