रोगापेक्षा इलाज भयंकर करणाऱ्या बारावी पास डॉक्टरला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:57+5:302021-05-08T04:07:57+5:30
जगदीश जोशी / लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळ करणारा चंदन चौधरी ...
जगदीश जोशी / लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळ करणारा चंदन चौधरी हा केवळ १२वी उत्तीर्ण आहे. नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम करून तो दुर्धर रोगांवर उपचार करीत होता. त्याचे मनोबल इतके मजबूत हाेते की, उपचारासोबतच तो नर्सिंगचे प्रशिक्षणही देत होता. चौधरीची सत्यता उघडकीस आल्यानंतर पोलीसही अचंबित झाले आहेत.
न्यू कामठी पोलिसांनी नगरपालिकेच्या मदतीने गुरुवारी सैलाबपुरास्थित हॉस्पिटलवर छापा मारून चौधरीला अटक करण्यात आली. हॉस्पिटलमधून सेक्स, गर्भपातासह अन्य उपचारांमध्ये वापरात येणाऱ्या औषधी व ऑक्सिजन सिलिंडर आढळून आले. ४५ वर्षीय चौधरी दहा वर्षांपासून हे हॉस्पिटल चालवीत आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची उपचारांसाठी गर्दी होत असल्याने, पोलिसांची नजर या हॉस्पिटलवर खिळली आणि बोगस कारभार उघडकीस आला. चौधरी मुळात बिहार येथील आहे. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि तिथेच एका चिकित्सकाकडे तो कंपाऊंडरचे काम करीत होता. कामकाजाचा अनुभव प्राप्त झाल्यावर तो बिहारमध्ये डॉक्टरसारखे काम करू लागला; परंतु, तेथे अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने १२ वर्षांपूर्वी तो नागपूरला आला. विनापदवी उपचार करणे जोखमीचे आहे, हे लक्षात आल्यावर त्याने उदरनिर्वाहासाठी आइस्क्रीम विक्रीचे काम केले. दरम्यान, त्याने नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर थेट हॉस्पिटल सुरू केले. सैलाबपुरा आणि नजीकच्या परिसरात गरीब व मध्यमवर्गीय लोक राहतात. ते चौधरीकडे उपचारासाठी येऊ लागले आणि चौधरीचा व्यवसाय वेग पकडू लागला. चौधरी इंटरनेट व पुस्तकांतून औषधांची माहिती घेऊन रुग्णांना ॲलोपॅथी औषधे व प्रिस्क्रिप्शनही देऊ लागला. सोबतच त्याने हॉस्पिटलमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमही सुरू केला. गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे चौधरीचे हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले होते आणि त्याचमुळे त्याचे पितळ उघडे पडले. तो कोरोना रुग्णांवर प्रोफेशनल चिकित्सकाप्रमाणे उपचार करीत होता. काही दिवसांपूर्वी कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नव्हते. चौधरीने वर्षभरात अनेक कोरोना संक्रमितांवर उपचार केले. ऑक्सिजन, औषधेही दिली, त्या रुग्णांचे काय झाले, याचा पत्ता पोलीस लावत आहेत. काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही पोलिसांना कळले आहे.
------------------
जडी-बुटीद्वारे वाढवत होता ‘पॉवर’
चौधरी स्वत:ला ॲलोपॅथीसह आयुर्वेदचे विशेषज्ञ म्हणवून घेत होता. तो सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधांची पावडर बनवीत होता आणि ते संबंधित जडी-बुटीच्या भुकटीमध्ये मिसळून सेक्स पॉवर वाढविण्यास इच्छुक लोकांना देत होता. अपेक्षित प्रभाव दिसून पडताच लोकांचा चौधरीवर विश्वास वाढत होता. मात्र, सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधांच्या अत्याधिक सेवनाने हृदयघात किंवा अन्य गंभीर आजार होण्याचा धोका असतो, याच्याशी चौधरीला काही घेणे-देणे नव्हते.
-----------------
गर्भपात करण्यासाठी मोठी रक्कम
अनैतिक संबंधातून युवतींचे गर्भपात झाल्याच्या गोष्टी अनेकदा ऐकण्यात येतात. चौधरी अशांसाठी उत्तम पर्याय ठरत होता. औषधांद्वारे तो सहजरीत्या गर्भपात करवून देत होता. अशा लोकांकडून वाट्टेल ती किंमतही मिळत होती. यासाठी त्याच्याकडे दूरवरून प्रेमी युगुल आणि अनैतिक संबंध ठेवणारे महिला-पुरुष येत होते.
................