बारावीत टक्का वाढला; पण विभागात तृतीयस्थानी घसरण
By संजय तिपाले | Updated: May 21, 2024 15:43 IST2024-05-21T15:41:47+5:302024-05-21T15:43:19+5:30
गडचिरोलीत लेकींचाच डंका : कला, वाणिज्य शाखेत अव्वल, विज्ञानमध्ये चौथ्यास्थानी

Twelfth percent increased; But fell to third place in the division
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मेरोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर झाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुणवत्तेचा टक्का वाढला आहे; पण नागपूर विभागात द्वितीयवरून तृतीयस्थानी घसरण झाली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.४२ एवढा लागला असून, मुलांपेक्षा यावेळीदेखील मुलींनीच सरशी मिळवत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी दुपारी १ वाजता निकाल घोषित झाला. जिल्ह्यातून बारावीला १२ हजार ५१३ प्रविष्ट होते. प्रत्यक्षात १२ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी (मुले ६२६८, मुली ६०८५) परीक्षा दिली. यापैकी ११ हजार ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ५ हजार ८२६ मुले व ५ हजार ८३८ मुलींचा समावेश आहे.
विभागात तृतीय स्थान मिळवलेल्या गडचिरोली जिल्ह्याने कला, वाणिज्य शाखेत अव्वलस्थान पटकावत दमदार कामगिरी बजावली आहे तर व्यावसायिक अभ्यासक्रमात जिल्हा द्वितीयस्थानी आहे. विज्ञानमध्ये जिल्ह्याचा क्रमांक विभागात चौथा आहे.
गडचिरोली जिल्हा
२०२३ - ९२.७२
२०२४ - ९४.४२
शाखानिहाय निकाल असा...
विज्ञान ९८.६८
कला ९१.१८
वाणिज्य ९७.१०
व्यवसाय अभ्यासक्रम ९२.५०