बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:02 PM2020-07-16T23:02:26+5:302020-07-16T23:05:27+5:30
गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने ‘कोरोना’ काळात विद्यार्थ्यांना केवळ दिलासाच मिळालेला नाही तर स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा निकाल ८.२१ टक्के तर नागपूर शहराचा निकाल ८.१२ टक्के वाढला हे विशेष.
विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील चैतन्य अय्यर याने ९९.२३ टक्के (६४५ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापाठोपाठ सोमलवार रामदासपेठ येथील विद्यार्थिनी सन्मती पांडे ही ९७.२ टक्के (६३२ गुण) प्राप्त करत दुसऱ्या क्रमांकावर आली. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश ढवळे याने ९७.०८ टक्क्यांसह (६३१ गुण) तिसरा क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेत सी.बी.आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी आयुषी नवगाजे ही ९६.१५ टक्के (६२५ गुण) प्राप्त करत प्रथम आली. तर याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गुंजन सहा व यशा दशोत्तर यांनी ९६ टक्के (६२४ गुण) मिळवत दुसरा क्रमांक मिळविला.
कला शाखेतून ‘एलएडी’ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैभवी कोहळे हिने ९४.१५ टक्के ( ६१२ गुण) मिळवत पहिले स्थान पटकाविले तर तेथीलच श्रेया दवे हिने ९४ टक्क्यांसह (६११ गुण) दुसऱ्या स्थानावर आली. ‘एमसीव्हीसी’मध्ये सिद्ध भोंगाडे हा टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आला.
विज्ञान शाखा
१ चैतन्य अय्यर डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९९.२३ %
२ सन्मती पांडे सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय, रामदासपेठ ९७.२० %
३ प्रथमेश ढवळे शिवाजी विज्ञान महाविद्यालय ९७.०८ %
वाणिज्य शाखा
१ आयुषी नवगाजे सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.१५ %
२ गुंजन सहा सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %
२ यशा दशोत्तर सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %
३ कामाख्या नाडगे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %
३ समिक्षा भिडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %
कला शाखा
१ वैभवी कोहळे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.१५ %
२ श्रेया दवे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.०० %
३ अनुश्री वखरे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९३.५४ %
विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजी
नागपूर विभागातून ७६,८९० पैकी ७२,३७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१३ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२६ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,२३८ पैकी २८,७१५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९४.९६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.७५ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९०.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.५३ टक्के इतका राहिला.
नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी उत्तीर्ण टक्केवारी
विद्यार्थी ३०,९५४ २७,९०९ ९०.१६
विद्यार्थिनी ३०,२३८ २८,७१५ ९४.९६
एकूण ६१,१९२ ५६,६२४ ९२.५३
उपराजधानीतील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी उत्तीर्ण टक्केवारी
विद्यार्थी १८,५७० १६,८३७ ९०.६७
विद्यार्थिनी १८,८८५ १७,९८१ ९५.२१
एकूण ३७,४५५ ३४,८१८ ९२.९६
गुणपडताळणीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज
१७ जुलैपासून गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी ऑललाईन अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतिसह २७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येणार आहे.उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी शुल्क भरुन संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ.रविकांत देशपांडे यांनी दिली आहे.