बारावीच्या निकालाला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:37+5:302021-07-24T04:06:37+5:30
नागपूर : दहावीचा निकाल वेळेत लावण्यात राज्य शिक्षण मंडळाला यश आले. परंतु बारावीच्या निकालात मंडळापुढे पावसाचे विघ्न निर्माण झाले ...
नागपूर : दहावीचा निकाल वेळेत लावण्यात राज्य शिक्षण मंडळाला यश आले. परंतु बारावीच्या निकालात मंडळापुढे पावसाचे विघ्न निर्माण झाले आहे. राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने वीज, इंटरनेट सेवा खोळंबल्या आहे. त्यामुळे ऑनलाईन मूल्यांकनास अडचणी जात आहे. वेबसाईट सपोर्ट करीत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
राज्य शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचे संकेत दिले होते. परंतु मूल्यांकनाची वेबसाईटच सुरुवातीचे दोन दिवस बंद होती. बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुणदान केले आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुणदान बोर्डाने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर भरायचे आहे. शिक्षण विभागाच्या बहुतांश वेबसाईटचे सर्व्हर सक्षम नसल्याने वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी भेडसावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा डाटा अपलोड करताना बराच कालावधी लागत आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. पूरपरिस्थितीमुळे वीज, इंटरनेटची व्यवस्था कोलमडली आहे. बोर्डाने मूल्यांकनासाठी २३ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. परंतु अजूनही अनेक शाळांचा डाटा वेबसाईटवर अपलोड व्हायचा आहे.
- मंडळाला निवेदन
मंडळाचे संकेतस्थळ १४ जुलैला सुरू होणार होते. ते १७ जुलैला सुरू झाले. ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. निकाल २३ तारखेपर्यंत तयार करून ऑनलाईनवर भरणे व त्याच तारखेला सीलबंद लिफाफा सादर करावा, अशा सूचना असल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांचा गोंधळ होऊन घाईने निकाल तयार झाल्यास चुका होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डॉ. अशोक गव्हाणकर, अनिल गोतमारे, प्रा. दिलीप तडस, डॉ. अभिजित पोटले, विलास केरडे, प्रा. सी.एल. पाचपोर या शिक्षकांनी विभागीय सचिव माधुरी सावरकर यांच्याकडे केली.
- शिक्षण मंडळामार्फत उपलब्ध संगणकप्रणाली दोन दिवस उशिरा सुरु झाली, त्यातच नेटवर्कची संथगती, तांत्रिक व इतर अडचणीमुळे वेळेत मूल्यांकन करणे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अवघड आहे. अशात राज्यभरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे इंटरनेट व विजेची व्यवस्था खेळंबली आहे.
प्रा.सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह, शिक्षकभारती