खापा शहरात स्वच्छतेचे बारा वाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:26+5:302021-09-03T04:09:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहरातील सफाई यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने शहराच्या साफसफाईचे बारा वाजले आहे. कचऱ्याची नियमित उचल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : शहरातील सफाई यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने शहराच्या साफसफाईचे बारा वाजले आहे. कचऱ्याची नियमित उचल करून वेळीच याेग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. परिणामी, शहरात डासांना पाेषण वातावरण निर्माण हाेत असल्याने मलेरिया व तत्सम कीटकजन्य आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे नगर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
खापा हे सावनेर तालुक्यातील प्रमुख शहर असून, शहरातील कचरा उचलण्याची व त्याची वेळीच याेग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही स्थानिक नगर परिषद प्रशासनाची आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून शहरातील साफसफाई यंत्रणा काेलमडल्यागत झाली आहे. कचऱ्याचे वेळीच उचल केली जात नसल्याने शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येतात. सध्या पावसाळा असल्याने पाऊस व दमट वातावरणामुळे हा कचरा लवकर सडायला व त्याची दुर्गंधी यायला सुरुवात हाेते.
काेराेना संक्रमण कमी हाेताच शहरात डेंग्यू ताेंड वर काढत आहे. शहरात मलेरिया व विषाणूजन्य रुग्णांची संख्या माेठी असल्याची माहिती खासगी डाॅक्टरांनी खासगीत दिली. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. हे आजार डासांपासून उद्भवत असल्याचेही डाॅक्टरांनी सांगितले. शहरात ठिकठिकाणी पडून असलेले कचऱ्याचे ढीग डासांच्या पैदासीला कारणीभूत ठरत असल्याची माहिती अनेकांनी दिली.
शहरातील काेलमडलेल्या साफसफाई यंत्रणेबाबत नगरपालिकच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना माहिती आहे. मात्र, शहराची वेळी साफसफाई व्हावी आणि नागरिकांचे आराेग्य निकाेप राहावे, यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. शिवाय, नागरिकही त्यांच्या घरातील कचऱ्याची याेग्य विल्हेवाट लावण्याऐवजी ताे राेडलगत टाकून माेकळे हाेतात. डेंग्यू, मलेेरिया व विषाणजन्य तापाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता हा कचरा खापावासीयांसाठी धाेकादायक ठरत आहे.
.....
डुकरांसह गाढवांचा मुक्तसंचार
खापा (ता. सावनेर) शहरात डुकरांसाेबत माेकाट जनावरे आणि गाढवांची संख्या माेठी आहे. या तिन्ही प्राण्यांचा शहरात मुक्तसंचार असून, खाद्य मिळत असल्याने हे तिन्ही प्राणी दिवसभर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फिरत असतात. त्यांचा मुक्त वावर असल्याने एका ठिकाणी कडून असलेला कचरा हळूहळू इतरत्र पसरत जाताे. याबाबत आपण नगर पालिका पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक नगरसेवकाला माहिती दिली आहे. मात्र, कुणीही गांभीर्याने घेतले नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
...
हा कचरा मुद्दाम टाकला जात आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते. शहरातील डुकरांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासन काम करीत आहे. याबाबत डुकरांच्या मालकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी सूचनांचे पालन न केल्यास डुकरे पडून जंगलात साेडली जाईल. शिवाय, राेडलगत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डाॅ. ऋचा धाबर्डे, मुख्याधिकारी,
नगर परिषद, खापा.
020921\img20210830093845.jpg
खापा शहरातील कचरा