नागपुरात पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी केले सामूहिक योगासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:43 PM2018-01-06T19:43:27+5:302018-01-06T19:45:19+5:30
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी यांच्या स्मृतीत आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा शनिवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतून जवळपास २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नियमित योगासन केल्यास संयम, धैर्य प्राप्त होते, एकाग्रता वाढते. त्याचे चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर व अभ्यासावर होतात. त्यामुळे विज्ञार्थी मित्रांनो करा हो नियमित योगासन असे आवाहन जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्याध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना केले.
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी यांच्या स्मृतीत आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा शनिवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, शशी वंजारी, नगरसेविका रूपा रॉय, नगरसेवक सुनील हिरणवार, संजय बंगाले आदी उपस्थित होते. या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतून जवळपास २५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजतापासून योगासन स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या सुरुवातीला ईश्वर प्रणिधान आणि गुरूचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर योगासन, प्राणायम, ओंकाराचा जप व शांतिमंत्र आदी योग प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. योगासनाचा हा भव्य सामूहिक उपक्रम माझ्या सासुबाईच्या स्मृतीत आयोजित करण्यात आल्याबद्दल आयोजकांचे आभार कांचन गडकरी यांनी मानले. तसेच विद्यार्थ्यांना ‘योग करोंगे तो मस्त रहोंगे, मस्त रहोंगे तो स्वस्थ रहोंगे’ असा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये योगसंस्कार रुजविण्यासाठी जनार्दन स्वामी मंडळाच्या उपक्रमाचे महापौर नंदा जिचकार यांनी कौतुक केले. यावेळी विविध शाळांना विविध प्रकारात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
योगाला जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणार
योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून योग शिकविला जावा. त्यातून विद्यार्थी प्रेरित होऊन पुढच्या वर्षी आंतरशालेय योगासनाचा हा सामूहिक सोहळा कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित करून, ५० हजारावर विद्यार्थी यात सहभागी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
स्पर्धेत या शाळांनी पटकाविले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पारितोषिक : मॉर्डन नीरी स्कूल, श्रेयस माध्यमिक शाळा वर्धमाननगर, भारतीय कृषी विद्यालय
सांघिकता : श्रेयस माध्यमिक विद्यालय, मॉर्डन नीरी स्कूल, सोमलवार रामदासपेठ
लयबद्धता : दयानंद आर्य कन्या शाळा, हिंदू ज्ञानपीठ, भारतीय कृषी विद्यालय
तालबद्धता : मनपा शाळा दुर्गानगर, सोमलवार निकालस खामला, शाहू गार्डन बेसा
आसनकृती : स्कूल आॅफ स्कॉलर्स वानाडोंगरी, विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळा, हिंदू मुलींची शाळा
आसनगती : हडस विद्यालय, साऊथ इस्टर्न रेल्वे प्रतापनगर, विनायकराव देशमुख विद्यालय शांतिनगर
आसनपूर्णा स्थिती : केशवनगर विद्यालय, हंसकृपा स्कूल, भारत विद्यालय
संख्या : विनायकराव देशमुख विद्यालय लकडगंज, सोमलवार निकालस खामला, मनपा संजयनगर स्कूल, मिनीमातानगर
मौन : मुंडले पब्लिक स्कूल, मनपा स्कूल जयताळा, सरस्वती विद्यालय सीताबर्डी
अथयोगानुशासन : जे.पी. इंग्लिश स्कूल, जिंदल पब्लिक स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल
गणवेश : राही पब्लिक स्कूल, टाटा पारसी स्कू ल, सरस्वती विद्यालय
विशेष पुरस्कार : मूकबधिर विद्यालय, सावनेर.