ऑपरेशन मॅनेजर, कॅशिअरकडून बॅंकेलाच साडेतेवीस लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 01:27 AM2023-12-09T01:27:43+5:302023-12-09T01:28:59+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नागपूर : खाजगी बॅंकेच्या ऑपरेशन मॅनेजर व कॅशिअरने ‘डबल एन्ट्री’ झाल्याचा बहाणा करत बॅंकेलाच तब्बल साडेतेवीस लाखांचा गंडा घातला. ही बाब उघडकीस आल्यानंतर दोघांविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बॅंक लिमीटेड या बॅंकेत हा प्रकार घडला. ऑपरेशन मॅनेजर रोशनकुमार विश्वासकुमार सोनी (तुमसर) व हेमंत धनंजय हजारे (देसाईगंज, गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत. ते या बॅंकेत कार्यरत होते. २ डिसेंबर २०२१ ते २७ जून २०२३ या कालावधीत बॅंकेतून कर्ज घेतलेल्या ग्राहकांचे पैसे घेतले. तशी बॅंकेच्या प्रणालीत नोंददेखील केली. मात्र ‘डबल’ नोंदणी झाली अशी बतावणी करत त्या नोंदी डिलीट करण्याची वरिष्ठांना परवानगी मागितली. त्यांनी वेळोवेळी बॅंकेच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात २३ लाख ५१ हजार रुपये वळते केले.
ही बाब समोर आली असता बॅंकेने अंतर्गत चौकशी केली. त्यात या दोघांनी केलेला गोलमाल समोर आला. बॅंकेचे स्टेट हेड मयुरेश धुमाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.