ड्रॅगन पॅलेस टेम्पला वीस वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 09:05 PM2019-11-06T21:05:51+5:302019-11-06T21:06:43+5:30
कामठीच नव्हे तर संपूर्ण नागपूरची एक ओळख बनलेला वैभवसंपन्न शांती शिल्प जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला २० वर्षे पूर्ण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठीच नव्हे तर संपूर्ण नागपूरची एक ओळख बनलेला वैभवसंपन्न शांती शिल्प जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला २० वर्षे पूर्ण होत आहे. येत्या कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर वर्धापन दिनानिमित्त १२ नोव्हेंबर रोजी ओगावा सोसायटीच्यावतीने ड्रॅगन पॅलेस टेम्पल दादासाहेब कुंभारे परिसर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जपान येथील प्रमुख विविध बुद्ध विहारांमधील वंदनीय प्रमुख भदंत व भिक्षुसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना होईल. अध्यक्षस्थानी जपान येथील आंतरराष्ट्रीय निचिरेन शु फेलोशिप असोसिएशनचे प्रमुख पूज्य भदंत कानसेन मोचिदा राहतील. यासोबतच भदंत कानसेन हासेगावा, भदंत कोशुन आकीझाकी, भदंत शिंग्यो इमाई, भदंत होशीन कावागिशी, भदंत कोशु सुजुकी, भदंत शिंक्यो यामागुची, भदंत हिदेकी तेरानिशी, भदंत गाक्युग्यो मत्सुमोेटो आदींसह जपान येथील प्रमुख २८ बुद्ध विहारातील प्रमुख भदंत तसेच बौद्ध प्रतिनिधी उपस्थित राहतील.
नोरिको ओगावा यांना अभिवादन
ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या महादानदात्या नोरीको ओगावा यांचे दीर्घ आजाराने गेल्या २ सप्टेंबर रोजी जपान येथे निधन झाले. दिवंगत ओगावा यांच्या महादनातूनच ड्रॅगन पॅलेस टेम्पलची निर्मिती होवू शकतील. बुद्धभूमी असलेल्या भारतात ड्रॅगन पॅलेस टेम्ल उभारल्याचे त्यांना मोठे समाधान होते. २० व्या वर्धापन दिनी जपान येथील भिक्षु संघाच्या उपस्थितीत त्यांना श्रेद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात येईल, असे टेम्पलच्या प्रमुख अॅड. सुलेखा कुंभारे यांनी सांगितले.