महिनाभरात ग्रामीणमध्ये डेंग्यूचे दुप्पट रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:22+5:302021-09-22T04:09:22+5:30
नागपूर : गेल्या तीन महिन्यापासून ग्रामीण भागात डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यात डेंग्यूचे ४६० ...
नागपूर : गेल्या तीन महिन्यापासून ग्रामीण भागात डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यात डेंग्यूचे ४६० रुग्ण होते. २० सप्टेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १०८२ रुग्ण नोंदविण्यात आले. यात ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.
कोरोनापाठोपाठ डेंग्यूने सुमारे तीन महिन्यापासून ग्रामीण भागात चांगलेच थैमान घातले आहे. सर्वाधिक २५० रुग्ण एकट्या कुही तालुक्यात आढळले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतस्तरावर तणनाशक फवारणी, घरोघरी फॉगिंग करणे व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. तसेच ज्या खुल्या भूखंडावर पाणी साचत असेल त्या भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थानिकस्तरावर उपाययोजना राबविण्याबाबत उदासीनता असल्यामुळेच दिवसेंदिवस ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत.
- खासगी उपचार करणाऱ्यांची नोंदच नाही
शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १०८२ रुग्ण आढळलेले आहेत. मात्र खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची कुठेही नोंद नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता चार हजारावर रुग्ण असू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.