‘नग्न कपल’ प्रकरणात ‘ट्विस्ट’; कारमधून आलेच नव्हते महिला व पुरुष, नवी माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:11 PM2024-07-30T23:11:45+5:302024-07-30T23:12:07+5:30
कारचालकाने दाखल केली तक्रार.
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांअगोदर लक्ष्मीनगर चौकाजवळ भर रस्त्यात नग्न जोडपे दिसल्याने खळबळ उडाली होती. संबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात आता एक नवीन ‘ट्विस्ट’ आला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या कारचालकाने इन्स्टाग्राम हॅण्डलर व व्हिडीओ काढणाऱ्याविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणाचा व कारचा काहीच संबंध नसतानादेखील त्यांनी बदनामी केल्याचा आरोप कारचालकाने लावला आहे. यावरून इन्स्टाग्राम हॅण्डलर व व्हिडीओ काढणाऱ्याविरोधात बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकाकडून श्रद्धानंदपेठ चौकाकडे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर नग्नावस्थेत एक महिला व पुरुष दिसून आले. तरुण फुटपाथच्या शेजारी असलेल्या एका मोडक्या घराकडे निघतो, असे व्हिडीओत दिसले होते. त्यावेळी रस्त्यावर तुरळक वर्दळ होती व दोन दुचाकीस्वारांनी याचा व्हिडीओ बनविला होता. सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच प्रसारित झाला. याबाबत बजाजनगर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पोलिसांनी व्हिडीओवरून दोघांचा शोध लावला व त्यांना पोलिस ठाण्यात आणले गेले. त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. यात एक कार दिसते व अनेकांनी संबंधित कारचालक अंकित याचाच त्यात समावेश असल्याचा समज करून घेतला. प्रत्यक्षात हॉटेलचा मालक असलेल्या अंकितने त्या जागेवर कार पार्क करून ठेवली होती. २७ जुलै रोजी ते मित्रासोबत बाहेर गेले होते. जेवण झाल्यानंतर ते कारमध्ये परतले. कारमध्ये बसलेले असतानाच संबंधित महिला व पुरुष तेथे पोहोचले. त्यावेळी दुचाकीचालकांनी व्हिडीओ बनविला. त्यात ते महिला-पुरुष कारमधून उतरण्याचा दावा करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अंकित यांना दुसऱ्या दिवशी अनेकांचे फोन आले. यामुळे त्यांना धक्काच बसला. त्यांनी संबंधित इन्स्टाग्राम हॅण्डलर वरुण याच्याशी संपर्क केला व व्हिडीओ डिलीट करण्याची विनंती केली. मात्र वरुणने उद्धटपणे वर्तन करत मला माहिती आहे की काय करायचे आहे, असे उत्तर दिले. या प्रकारामुळे माझी प्रतिमा मलिन झाली, असा आरोप करत संबंधित इन्स्टाग्राम चॅनल लगेच बंद करण्याची मागणी तक्रारीतून केली. पोलिसांनी या प्रकरणात वरुण व व्हिडीओ बनविणाऱ्या दुचाकीवरील व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ व ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुरुष करत होता महिलेला विनंती
संबंधित प्रकरणात अगोदर महिला धावत आली. त्यानंतर तिच्या मागे पुरुष आला व तिला तो घरी चल अशी विनंती करत होता. अंकित यांनी विचारणा केली असता ती महिला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली.