भिवापुरात दोन अपघात, एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:03+5:302021-01-20T04:11:03+5:30
भिवापूर : भिवापूर शहरातून जाणाऱ्या नक्षी व चिखली अशा दोन मार्गांवर मंगळवारी (दि. १९) रात्री ११ वाजताच्या सुमारास ...
भिवापूर : भिवापूर शहरातून जाणाऱ्या नक्षी व चिखली अशा दोन मार्गांवर मंगळवारी (दि. १९) रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींचे अपघात झाले. यात शहरातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. दुसऱ्या एका अपघातात आरोग्य केंद्रातील कर्मचारी गंभीर जखमी झाला. या अपघात सत्रातील तरुणाच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आकाश परसराम सोनुने (वय २०, रा. सिद्धार्थ नगर भिवापूर असे मृताचे, तर त्याचा मित्र सुमित पंडित पवार (२४, रा. झाशीराणी चौक, भिवापूर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दुसऱ्या अपघातात जखमी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव शाबीर इकबाल शेख सत्तार (३०, रा. काटोल रोड, नागपूर) असून, तो तालुक्यातील जवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात चपराशीपदी कर्तव्यावर आहे. पहिला अपघात चिखली मार्गावर झाला. मृत आकाश व त्याचा जखमी मित्र सुमित हे पल्सर दुचाकी एम.एच. ४० बी. वाय. ८४२५ ने चिखलीवरून भिवापूरला येत होते. दरम्यान, भिवापूर लगत त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की, दुचाकीचा पूर्णता चुराडा झाला. यात आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एखाद्या भरधाव वाहनाने दुचाकीला उडविले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दुसरा अपघात भिवापूर-नक्षी मार्गावर झाला. प्राप्त माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी दुचाकीने जवळी येथे कर्तव्यस्थळी जात होता. दरम्यान, दुचाकी घसरल्याने अपघात झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात कॉन्स्टेबल भगवानदास यादव, नरेश बाटबराई यांनी घटनास्थळी दाखल होत मृतक व जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही अपघातातील दोन्ही जखमींना नागपूरला हलविण्यात आले.
पहिला फोन केला तेव्हा 'तो' बोलला... दुसरा नि:शब्द...
आकाशचे वडील परसराम सोनुने हे स्थानिक डॉ. मिथीलेश काकडे यांच्या दवाखान्यात कम्पाउंडर आहेत. त्यांना एक मुलगी व आकाश हा एकुलता एक मुलगा होता. मुलाच्या जिद्दीखातर वडिलांनी काही महिन्यांपूर्वी त्याला पल्सर गाडी घेऊन दिली. दरम्यान, आज अपघात होण्यापूर्वी रात्री नऊ वाजताच्या सुमारास वडिलांनी आकाशला जेवण करायला येण्यासाठी फोन केला. त्यावर तुम्ही जेवण करून घ्या... मी येतोच ! असे त्याने सांगितले. त्यानंतर काहीवेळातच दुसरा फोन आला... अन् वडील परसराम नि:शब्द झाले.