दोन आरोपींना अटक

By admin | Published: May 10, 2015 02:10 AM2015-05-10T02:10:31+5:302015-05-10T02:10:31+5:30

पाटणसावंगी येथे वेकोलि वर्कर्स क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तिघांनी शस्त्राने वार करून खून केला.

Two accused arrested | दोन आरोपींना अटक

दोन आरोपींना अटक

Next

सावनेर / खापरखेडा : पाटणसावंगी येथे वेकोलि वर्कर्स क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षाचा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तिघांनी शस्त्राने वार करून खून केला. याप्रकरणात आरोपींपैकी दोघांना सावनेर पोलिसांनी अटक केली असून आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. जागेच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
फिरोज ताज मोहम्मद शेख (४६) आणि दिलीप रतनलाल मदने (४२) दोघेही रा. पाटणसावंगी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चिरकुट गोविंदराव मोजे (५६) रा. पाटणसावंगी ह.मु. झिंगाबाई टाकळी, नागपूर असे मृताचे नाव आहे. मोजे यांच्या पत्नीच्या नावाने पाटणसावंगी येथे महामार्गालगत शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यातील एक दुकान आरोपी फिरोजने विकत मागितले होते.
मात्र ते देण्यास नकार दिल्याने आरोपीने मोजे यांना संपविण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास चिरकुट मौजे हे त्यांच्या राजहंस मंगल कार्यालयात आले असता त्यांना बेताने घटनास्थळी आणले.
तेथे आरोपींनी त्यांच्या मान, छाती, कान, पोट आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. घटनास्थळी चिरकुट मोजे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना लगेच नागपुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी सावनेर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. दरम्यान आरोपींपैकी फिरोज शेख याला मोमिनपुरा नागपूर येथून पहाटे ३ वाजता तर दिलीप मदने याला पाटणसावंगी येथील त्याच्या राहत्या घरून पहाटे ४ वाजता पोलिसांनी अटक केली.
आरोपींना शनिवारी सावनेर न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ करीत आहे. (प्रतिनिधी)

असा रचला डाव
जागेच्या वादातून चिरकुट मोजे यांचा संपविण्याचा कट आरोपी फिरोजने रचला होता. त्यानुसार शुक्रवारी फिरोज शेख आणि नाना केने हे दोघे पाटणसावंगी पोलीस चौकीत गेले तर फिरोजचा भाऊ असलम शेख आणि दिलीप मदने हे दोघे असलमच्या कबाडीच्या दुकानात बसून होते. चिरकुट मोजे हे कळमेश्वर येथून लग्नसमारंभातून त्यांच्या पाटणसावंगीतील राजहंस मंगल कार्यालय आणि लॉन येथे आले. दरम्यान आरोपींना इशारा मिळताच ते राजहंस लॉनमागे काम पाहून खुर्चीवर बसलेल्या चिरकुट यांच्याकडे गेले. तेथे आरोपींनी जागेचा वाद उकरून काढत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. त्यानंतर आरोपी हे मोटरसायकलने पळून गेले.

किशोर चौधरींच्या घरावर हल्ला
परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी यांना मोजे यांच्या खुनाबाबत माहिती होताच ते रात्रीच पाटणसावंगी येथे गेले. या भागातील राजकीय नेत्याचे ते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. या प्रकरणात ते काही वाच्यता करतील, याची शक्यता असल्याने काहींनी चौधरी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. दरम्यान ते दहेगाव (रंगारी) येथे घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरावर हल्ला चढविला तसेच दार ठोठावले. मात्र चौधरी यांनी दार उघडले नाही. याबाबत चौधरी यांनी खापरखेडा पोलिसांना सूचना दिली. मात्र रात्री पोलीस आले नाही. अखेर शनिवारी सकाळच्या सुमारास त्यांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यात आपल्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच घटनेपूर्वी आरोपी हे पाटणसावंगी पोलीस चौकीत पोलिसांसमक्ष हजर होते. त्यांना मोबाईलवर कॉल आला आणि ते पोलिसांसमोरच घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे या घटनेत पोलिसांची मिलिभगत असावी, असाही आरोप चौधरी यांनी केला आहे.

Web Title: Two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.