कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 12:24 AM2021-07-31T00:24:03+5:302021-07-31T00:24:26+5:30
Accused involved multi-crore scam have been arrestedओळखीच्या व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांना विमान तिकीट खरेदी विक्री तसेच विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीत बक्कळ नफा मिळत असल्याची थाप मारून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ओळखीच्या व्यक्तींना जाळ्यात ओढून त्यांना विमान तिकीट खरेदी विक्री तसेच विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीत बक्कळ नफा मिळत असल्याची थाप मारून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. देवेंद्र गोविंद गोयल आणि रितेश गोविंद गोयल अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
तहसील ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात देवेंद्र आणि रितेश गोविंद गोयल सोबत गोविंद मुरालीलाल गोयल, निकिता देवेंद्र गोयल आणि पायल सोमाणी हे पाच आरोपी आहेत. टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, श्री ट्रॅव्हल्स लिंक आणि श्री हॉलिडेज इंटरनॅशनल हॉटेल, फ्लाईटस् बुकिंग, प्री बुकिंग नावाने आरोपी व्यवसाय करतात. ते ओळखीच्या धनाड्य मंडळींना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना आमच्याकडे विमान कंपन्यांची कॉर्पोरेट आयडी असून तिकीट आगावू बूक केल्यास आणि नंतर त्याची विक्री केल्यास चांगला नफा मिळतो, अशी थाप मारतात. परदेशातून प्रवासाला येणारे इंटरनॅशनल फ्लाईटचे प्रवासी त्यांच्या जवळचे विदेशी चलन कमी किंमतीत देतात. तर, विदेशात जाणारे प्रवासी ते जास्त किंमतीत घेतात. या दोन्ही व्यवहारात मोठा नफा मिळतो, असेही सांगतात. त्यांच्या ओळखीचे व्यावसाियक आशिष जैन (इतवारी) यांना त्यांनी असेच सांगितले होते. या व्यवहारात रक्कम जेवढी जास्त रक्कम गुंतविली तेवढा मोठा लाभ मिळतो, असे सांगतानाच आरोपींनी त्यांच्याकडे श्री हॉलिडेजच्या नावाने असलेले भारतीय रिझर्व बँकेचे बनावट लायसेन्सही दाखवले. आरोपींवर विश्वास ठेवून २०१४ ते २०१८ दरम्यान आशिष जैन यांनी आरोपींना २ कोटी, २९ लाख, ९० हजार रुपये दिले. त्यातील १ कोटी, १६ लाख, ८१, ५०० रुपये आरोपींनी परत केले. १ कोटी, १३ लाख, ८५०० रुपयांची रक्कम मात्र आरोपींनी परत केली नाही. वारंवार मागणी करूनही ते वेगवेगळे कारण सांगत होते. त्यांनी हेतूपुरस्सर फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने जैन यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे होता. तपास पथकाने देवेंद्र गोविंद गोयल, रितेश गोविंद गोयल या दोघांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कस्टडीत आहेत.
विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
आरोपींनी अशा प्रकारे अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला असून यापूर्वी त्यांच्याविरुद्ध नंदनवन, अंबाझरी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल झाले आहेत. अशाच प्रकारे कुणाची रक्कम आरोपींनी हडपली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.