अडीच लाखांत मेट्रो रेल्वेच्या नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 09:16 PM2022-02-26T21:16:44+5:302022-02-26T21:18:07+5:30
Nagpur News अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने अडीच लाख रुपये हडप केले. बदल्यात त्याला नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्रही दिले.
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने अडीच लाख रुपये हडप केले. बदल्यात त्याला नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्रही दिले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर महेंद्र नानाजी डाहे (३७) यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गज्जू ढोके, परमेश्वर वरठे, राजेश रोहिले, किशोर ढोणे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असून, त्यांचा एक साथीदारही या बनवाबनवीत सहभागी आहे.
मोर्शी (जि. अमरावती) येथील रहिवासी असलेले डाहे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या शोधात होते. त्यांनी आपल्या मित्र आणि नातेवाइकांनाही कुठे काही जॉब असेल तर सांगा, असे म्हणून खर्चपाणी करण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या नात्यातील एका तरुणाने उपरोक्त आरोपींपैकी एकाची ओळख डाहेसोबत तीन वर्षांपूर्वी करून दिली. आरोपीने मेट्रो रेल्वेत जागा असल्याची थाप मारून अडीच लाख रुपये द्यावे लागतील, असे डाहेला सांगितले. डाहेंनी तयारी दाखवताच २९ ऑगस्ट २०१९ ला आरोपींनी सदरमधील मेट्रो रेल्वेच्या कार्यालयाजवळ बोलावून घेतले. तेथे पोहोचताच आरोपींनी डाहेंकडून अडीच लाखांची रोकड घेतली आणि आपल्या साथीदाराला फोन लावला. त्याने मेट्रोच्या कार्यालयातून येऊन डाहेंच्या हातात नियुक्तीपत्र ठेवले. काही दिवसांनंतर हे नियुक्तीपत्र घेऊन डाहे मेट्रो कार्यालयात गेले. अधिकाऱ्यांनी ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगितल्यानंतर डाहेंना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरोपींशी संपर्क करून आपली रक्कम परत मागितली. आज देतो, उद्या देतो अशी थाप मारत आरोपींनी तब्बल अडीच वर्षे झुलविले. ते रक्कम परत करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे डाहेंनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विनोद चाैधरी यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अनेकांची फसवणूक
या प्रकरणात नागपूरसह अमरावती आणि वर्धेतील आरोपींचाही समावेश आहे. त्यांनी अशा प्रकारे अनेकांना ठकविल्याचा संशय आहे. आरोपी हाती लागल्यानंतर अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत.
----