अडीच हजार जणांनी फुकटात प्रवास केला, पकडल्यावर दुप्पट दंड भरला!
By नरेश डोंगरे | Published: March 16, 2024 07:24 PM2024-03-16T19:24:18+5:302024-03-16T19:26:52+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात १३ दिवस तिकिट तपासणीची विशेष मोहीम पार पडण्यात आली.
नागपूर : आपलीच गाडी आहे, कशाला तिकिट घ्यायचे, अशा अविर्भावात रेल्वे गाड्यांमधून बिनधास्त प्रवास करणाऱ्या अडीच हजार फुकट्या (विना तिकिट) प्रवाशांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांना पकडण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात १३ दिवस तिकिट तपासणीची विशेष मोहीम पार पडण्यात आली.
रेल्वे ही आपलीच संपत्ती आहे, तिचा जपून वापर करा, अशा आशयाचे स्लोगन रेल्वे गाड्यांमध्ये जागोजागी लिहून असते. त्याचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढून गाडी आपलीच असल्यामुळे आपण तिचा पाहिजे तसा वापर करू शकतो, असा गोड गैरसमज काहीजण करून घेतात आणि प्रवासाची तिकीट न काढताच ते रेल्वेने प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी रेल्वेचे अधिकारी वेगवेगळ्या मार्गावर तिकीट तपासणीची वारंवार मोहीम राबवितात. अनेक जण या मोहिमेत पकडलेही जातात. मात्र त्यांच्यावर फारसा काही परिणाम होत नाही. नंतर परत ते विना तिकिटच प्रवास करतात. यावेळी १२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विविध मार्गावर वेगवेगळ्या गाड्यामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली. १३ दिवसाच्या या मोहिमेत वेगवेगळ्या ठिकाणी २५३४ फुकटे प्रवासी आढळले. त्या सर्वांविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याकडून प्रवासाच्या तिकिटां व्यतिरिक्त दाम दुप्पट दंड वसूल करण्यात आला.
तिकीट जनरलचे प्रवास एसी मधून
या मोहिमेत काही बेशिस्त प्रवासीही आढळले. त्यांच्याकडे तिकीट जनरलचे होते. मात्र ते एसीच्या डब्यातून प्रवास करीत होते. या आणि विना तिकिट अशा एकूण सर्वच प्रवाशांकडून रेल्वे अधिकाऱ्यांनी
१४ लाख, २४, ७९५ रुपये दंड खातर वसूल केले. फुकट्या आणि बेशिस्त प्रवाशांविरुद्ध रेल्वेकडून ही मोहीम अशाच प्रकारे वारंवार राबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.