नागपुरात गंजेट्यांनी जाळल्या कार, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:21 AM2021-01-05T00:21:52+5:302021-01-05T00:23:20+5:30
burnt cars, crime news इमामवाडा उंटखान्यात कार जाळणारे तीन आरोपी गंजेट्टी आहेत. गांजाची नशा भिनल्यानंतर त्यांनी कार जाळून नासधूस केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमामवाडा उंटखान्यात कार जाळणारे तीन आरोपी गंजेट्टी आहेत. गांजाची नशा भिनल्यानंतर त्यांनी कार जाळून नासधूस केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शंभू मंडल (वय २२, रा. मधुबनी, बिहार) आणि विशाल राऊत (१९, रा. बोरगाव अर्जुनी, जि. गोंदिया) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
इमामवाड्यातील दहीपुरा लेआऊटमध्ये शनिवारी रात्री तीन कार पेटवून आरोपी पळाले होते. हा प्रकार रविवारी सकाळी उघड झाल्यानंतर परिसरात प्रचंड रोष निर्माण झाला. दोन महिन्यांपूर्वी अजनी, नरेंद्रनगर, बेलतरोडीत समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात कारची तोडफोड केली होती. आता तीन कार पेटवून दिल्याचे कळाल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके कामी लागली. एका सीसीटीव्हीत आरोपी दुचाकीवरून जाताना दिसल्याने शंभू मंडल आणि विशाल राऊतला रविवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची चांगली खातरदारी केली तेव्हा त्यांनी कार जाळल्याची कबुली दिली. गांजाची नशा जास्त झाल्याने बेभान होऊन हा गुन्हा केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
या दोघांची पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली असता त्यांनी आपल्या मूळ गावाची नावे आणि सध्याच्या कामाचे ठिकाण सांगितले. त्यानुसार, शंभू मंडल एका सावजी भोजनालयात तर विशाल राऊत बसस्थानक परिसरात हॉटेलमध्ये काम करतो. या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी काम संपविल्यानंतर गांजाची चिलम भरली आणि नशेेत बेभान झाल्यानंतर ते शंभूच्या चंदननगरातील खोलीकडे निघाले. दहिपुऱ्यात पार्क केलेल्या एका कारचे कव्हर बाहेर लोंबत असल्याचे पाहून त्यांनी लायटरने त्याला आग लावली. नंतर आणखी दोन कारला अशाच प्रकारे आग लावून ते पळून गेले.
कडक शिक्षा व्हावी
कोणताही वाद नसताना वाहनचालकांना हजारोंचा नाहक फटका देणाऱ्या या समाजकंटकांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी या घटनेनंतर पुढे आली आहे. पोलीस या दोघांचा गुन्हेगारी अहवाल तपासत आहेेत.