आमदाराच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 09:52 PM2023-03-28T21:52:33+5:302023-03-28T21:53:08+5:30

Nagpur News विधानपरिषदेतील आ.वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Two arrested for accepting bribe of 25 lakhs in the name of MLA | आमदाराच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

आमदाराच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

googlenewsNext

योगेश पांडे 
नागपूर : विधानपरिषदेतील आ.वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकाऱ्याला एक कोटींची लाच मागितली होती. लाच घेताना पकडण्यात आलेला एक आरोपी एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञ असून दुसरा राजकीय कार्यकर्ता आहे. तक्रारदार अधिकारी ‘आरटीओ’तील असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातदेखील खळबळ माजली असून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित अधिकाऱ्याविरोधात त्यांच्यात विभागातील महिला अधिकाऱ्याने तक्रार केली आहे. यासंदर्भात आ.वजाहत मिर्झा यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र हाच मुद्दा पकडून एमआयडीसी-अमरावती येथील टेक्निशिअन दिलीप वामनराव खोडे (५०, हिरानंदानी मिडोज, ठाणे पश्चिम) व शेखर भोयर (अमरावती) या दोघांनी तक्रारदार अधिकाऱ्याला संपर्क केला. आपण आ.मिर्झा यांच्या जवळचे असून विधानपरिषदेत यापुढे हा प्रश्न उपस्थित होणार नाही व तक्रारीवर कुठलीही कारवाई न होता मुद्दा परस्पर मिटविल्या जाईल, अशी बतावणी करत दोन्ही प्रकरणांचे प्रत्येकी ५० लाख असे एकूण १ कोटी रुपये मागितले. ही रक्कम फार जास्त होत असल्याचे म्हणत अधिकाऱ्याने हात वर केले. मात्र दोन्ही आरोपींनी २५ लाख रुपयांत प्रकरण निपटविण्याची तयारी दाखविली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

विभागातील अधिकाऱ्यांनी या तक्रारीची प्राथमिक चाचपणी केली व त्यानंतर कारवाईची तयारी केली. ठरल्यानुसार अधिकारी २५ लाख रुपये घेऊन मंगळवारी सायंकाळी रविभवन येथे गेले. तेथे लाच स्वीकारत असताना दोन्ही आरोपींना दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले. आपण अडकलो असल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी आ.वजाहत मिर्झा यांचे नाव घेण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आ.मिर्झा यांचे नाव का घेण्यात आले याबाबत दोघांचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस निरीक्षक सचिन मते, निलेश उरकुडे, प्रीती शेंडे, सुशील यादव, हरीश गांजरे, बादल मांढरे, सूरज भोंगाडे, विनोद नायगमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

प्रसारमाध्यमांतूनच कारवाईची माहिती, माझा संबंध नाही : मिर्झा
यासंदर्भात वजाहत मिर्झा यांना संपर्क केला असता त्यांनी या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांकडूनच मिळाल्याचे सांगितले. मला प्रसारमाध्यमांकडूनच हा प्रकार कळाला आहे. माझे या प्रकरणात काहीच घेणेदेणे नाही. दोन्ही आरोपींशी माझा काहीच संबंध नाही. माझ्याकडे विविध प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करत अनेक सामान्य लोक येतात. त्यातील योग्य प्रश्न मी विधानपरिषदेत उपस्थित करतो. तर कधी आवश्यक पत्र देतो. संबंधित मुद्दा तर मीच विधीमंडळात उपस्थित केला होता. माझ्या नावाचा गैरवापर करून हा प्रकार करण्यात आला आहे, असा दावा मिर्झा यांनी केला.

Web Title: Two arrested for accepting bribe of 25 lakhs in the name of MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.