आधी सिगारेट पाजली नंतर दगडाने ठेचून ठार मारले; दोन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 10:51 AM2022-04-22T10:51:50+5:302022-04-22T12:27:24+5:30

सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यांनी माहिती देताच अजनीचा पोलीस ताफा तेथे धडकला.

two arrested for killing a man over a dispute in ajni nagpur | आधी सिगारेट पाजली नंतर दगडाने ठेचून ठार मारले; दोन आरोपी गजाआड

आधी सिगारेट पाजली नंतर दगडाने ठेचून ठार मारले; दोन आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देनशेत शिवीगाळ करणे पडले महागात नागपुरात मनोरुग्णाची थरारक हत्या

नागपूर : सिगारेट आणि दारू पाजल्यानंतर दोन गुन्हेगारांनी एका मनोरुग्णाची दगडाने ठेचून हत्या केली. गुरुवारी सकाळी हे थरारकांड उघडकीस आल्यानंतर अजनी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. उज्ज्वल भिसीकर (वय २७) आणि राकेश चैनसिंग महेश्वर (वय ३०, रा. मानेवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. संदीप किसनराव दुपारे (वय ४०) असे मृताचे नाव आहे. तो मानेवाडा-बेसा मार्गावरच्या कपिलनगरात राहत होता.

संदीपची मानसिक अवस्था चांगली नव्हती. त्याचा उपचारही सुरू होता. अनेकदा तो घरून निघून जायचा. बाटल्या, कचरा वेचून विकायचा अन् काहीही खाऊन कुठेही झोपायचा. अधूनमधून घरी परतायचा. त्यामुळे घरच्यांना त्याची तशी सवय झाली होती.

आरोपी उज्ज्वल आणि राकेश या दोघांना दारू, गांजाचे व्यसन आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ते अंबाशिवशक्ती नगरातील गॅस गोदामाजवळ नशा करीत बसले होते. तेथे त्यांच्याजवळ संदीप आला. त्याने आधी सिगारेट मागितली. आरोपींनी गांजाने भरलेली सिगारेट दिल्यानंतर तो तेथेच बसला. त्यामुळे आरोपींनी त्याला दारूही पाजली. नशा डोक्यात भिनल्यानंतर संदीपची मानसिक अवस्था बिघडली. तो आरोपींना शिवीगाळ करू लागला. त्यामुळे त्यांनी संदीपला लाथाबुक्क्यांनी मारले आणि नंतर डोक्यावर दगडाने ठेचून आरोपी पळून गेले.

सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्यांनी माहिती देताच अजनीचा पोलीस ताफा तेथे धडकला. त्यांनी संदीपचे फोटो काढून ते परिसरातील नागरिकांना दाखवून त्याची ओळख पटवली. दरम्यान, संदीपचा भाऊ प्रदीप किसनराव दुपारे (वय ३७) तेथे पोहचला. मृत व्यक्ती संदीपच असल्याचे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी दुपारी उज्ज्वल आणि राकेशला अटक केली. त्यांनी हत्येची कबुली दिली.

आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे

आरोपी उज्ज्वल आणि राकेश दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार, तसेच अन्य प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नागपूर आणि चंद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद आहे.

१० दिवसांत तिसरी हत्या

गेल्या १० दिवसांतील ही हत्येची तिसरी घटना आहे. पारडीत ११ एप्रिलला एका महिलेने अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर मुलीच्या मदतीने पतीची हत्या केली. गार्ड लाईन मोमिनपुऱ्यातील एका दांपत्याने अनैतिक संबंधातूनच एका व्यक्तीची हत्या करून भंगार कारच्या डिक्कीत मृतदेह लपविला तर आता अजनीत ही घटना घडली.

Web Title: two arrested for killing a man over a dispute in ajni nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.