महाराष्ट्र बँक दरोड्यातील दोघांना अटक : सहा लाखांची रोकड, चार मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:34 PM2019-03-15T21:34:25+5:302019-03-15T21:35:53+5:30
सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून तेथील २३ लाखांची रोकड तसेच सोने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील बिहारच्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कराड) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून तेथील २३ लाखांची रोकड तसेच सोने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील बिहारच्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. श्रवणकुमार ब्रीजनंदनप्रसाद यादव (वय २४, रा. जमालुद्दीन चौक, दानापूर, जि. पटना) आणि अभिषेककुमार रणजितसिंग (वय २०, रा. नेवरा कॉलनी खवल, दानापूर, जि. पटना) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ६ लाख, १९,५०० रुपयांची रोकड तसेच ४ मोबाईल असा एकूण ६ लाख, ३१ हजार, २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. या टोळीकडून करण्यात आलेले आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकारांना सांगितले.
स्वीफ्ट कारमधून आलेले ५ पिस्तुलधारी दरोडेखोर ११ मार्चला दुपारी ४ वाजता बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेणोली शाखेत शिरले. त्यांनी हवेत गोळीबार करून तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना बँकेच्या स्ट्राँग रूममध्ये डांबले. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून २३ लाख, २० हजारांची रोकड तसेच ३९०.७६ ग्राम सोने लुटून नेले. व्यवस्थापक अमोल गोवर्धन शिंदे यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दरोड्याची तसेच तेथील सीसीटीव्हीच्या फुटेजमधून आरोपी संबंधीची माहिती कळविली. आरोपी नागपूरकडे येण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली होती. त्यासंबंधाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या आरोपींना पकडण्यासंबंधीचे निर्देश शहर पोलिसांना दिले. त्यावरून उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेची पथके साताऱ्याकडून येणाऱ्या बसवर नजर ठेवून होते. युुुनिट तीनचे पथक अशाच प्रकारे वर्धा मार्गावरील खापरीत रात्रभर बसची झडती घेत होते. साताऱ्याकडून आलेल्या एका खासगी बसमध्ये आरोपी यादव तसेच सिंग हे दोघे शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास पोलीस पथकाच्या हाती लागले. त्यांच्याकडे ६ लाखांच्या वर रोकड असल्याचे पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची ओळख पटविण्यात आली.
त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सातारा पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मागवून घेतल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला. सातारा पोलिसांचे पथक या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी नागपूरकडे निघाले असून, शनिवारी सकाळपर्यंत ते नागपुरात पोहचेल. त्यानंतर आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, गोरख कुंभार, चंद्रकांत माळी (कराड, जि. सातारा), पोलीस उपनिरीक्षक नीतेश डोर्लीकर, हेमंत थोरात, एएसआय श्रीनिवास मिश्रा, राजकुमार देशमुख, राजेंद्र बघेल, हवालदार सुरेश हिंगणेकर, अनिल दुबे, विठ्ठल नासरे, रवी बारई, अमित पात्रे, अतुल दवंडे, श्याम कडू, राहुल इंगोले, संदीप मावळकर, राजेंद्र सेंगर, शेख फिरोज, शेख शरिफ यांनी ही कामगिरी बजावली.
हमे क्या पता?
नागपुरात आल्यानंतर येथून दिल्लीला आणि तेथून बिहारला जाण्याचे आरोपींचे मनसुबे होते. खुराणा ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर बस साताºयापासून बरीच पुढे आल्याने आरोपी यादव तसेच सिंग बिनधास्त होते. मात्र, खापरी नाक्यावर पहाटे ४ च्या सुमारास बस थांबवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तशाही अवस्थेत ते निर्ढावलेपणाचा परिचय देत होते. त्यांना गुन्हे शाखेत आणल्यानंतर पोलिसांच्या चौकशीला ते बेदरकारपणे सामोरे गेले. ही रक्कम कुठून आणली, अशी विचारणा केली असता त्यांनी ही आपली रक्कम नसल्याचे सांगून कुणीतरी ती आपल्या सीटजवळ टाकली असावी, असे ते म्हणाले. बरीच टाळाटाळ केल्यानंतर आरोपींनी अखेर रक्कम बँक दरोड्यातील असल्याचे कबूल केले.
२४ तासात सोन्याची विल्हेवाट
प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, या आंतरराज्यीय टोळीत बिहार, बेंगलुरू, दिल्लीसह अनेक राज्यातील सराईत गुन्हेगार सहभागी आहेत. या टोळीने बँकेतून लुटलेले सोने बेंगलुरू येथे विकले. त्यातून आलेली रक्कम तसेच बँकेत हाती लागलेले २३ लाख, १९ हजार एकत्र करून आरोपींनी हिस्सेवाटणी केली. त्यानंतर ते वेगवेगळ्या मार्गाने बिहारकडे निघाले. आरोपी यादव तसेच सिंग या दोघांच्या वाट्याला ६ लाख, २५ हजार रुपये आले. त्यावरून बँकेत दरोडा घालण्याच्या कटात पाच पेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.