नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 09:08 PM2021-12-17T21:08:13+5:302021-12-17T21:09:13+5:30
Nagpur News नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात सदर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास सुरुवात करताच या घोटाळ्यात सहभाग असलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नागपूर : महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात सदर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास सुरुवात करताच या घोटाळ्यात सहभाग असलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीत अतुल मनोहर साकोडे व कोलबा जनार्दन साकोडे यांचा समावेश आहे. स्टेशनरी घोटाळ्यासंदर्भात सदर पोलिसांनी बुधवारी रात्री कोलबा साकोडे, त्यांची पत्नी सुषमा साकोडे, अतुल साकोडे व मनोहर साकोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी ७ ऑक्टोबर २०२० ते ३१ जुलै २०२१ दरम्यान स्टेशनरीचा पुरवठा न करता खोटी बिले तयार केली. ही बिले मनपाच्या वित्त विभागाकडे सादर करून ६७ लाख ८ हजार ६३० रुपयांचे बिल उचलले. काही दिवसांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मनपातील कर्मचारी या प्रकरणात सहभागी असल्याचे आरोपींचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांनी खोटी बिले ताब्यात घेतली होती. बिलाची रक्कम आरोपींच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी पुरवठा न करता बिल जमा झाल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र हा मनपा यंत्रणेच्या पद्धतीचा भाग असल्याचे सांगून मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला होता. यामुळे आम्ही गप्प होतो, असे आरोपीचे म्हणणे आहे. चौकशीत त्यांनी काही कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत. पोलीस आरोपींनी दिलेल्या माहितीची शहानिशा करीत आहेत. पुढील काही दिवसांत आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सदर पोलिसांच्या ताब्यात दिले.