शेडनेट प्रकरणात दोघांना अटक
By admin | Published: April 15, 2016 03:13 AM2016-04-15T03:13:26+5:302016-04-15T03:13:26+5:30
जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्याची ‘शेडनेट व पॉलिहाऊस’च्या नावाखाली लाखो रुपयांनी लुबाडणूक करून कर्जबाजारी ...
नागपूर : जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्याची ‘शेडनेट व पॉलिहाऊस’च्या नावाखाली लाखो रुपयांनी लुबाडणूक करून कर्जबाजारी करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना गुरुवारी कुही पोलिसांनी अटक केली आहे. दिशा ग्रीन हाऊस मार्केटिंग कंपनीचे मालक पांडुरंग महाजन व कुंदन महाजन दोघेही रा. यावल जि. जळगाव अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना कुहीचे ठाणेदार प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात एका विशेष पथकाने यावल येथून अटक केली आहे.
याप्रकरणी एकूण चार आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९ व ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नागपुरातील बायोमिक्स कंपनीचे मालक अभिजित महाजन यांनी न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणाचा ‘लोकमत’ने सर्वप्रथम भंडाफोड करून, त्याचा सतत पाठपुरावा केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी उमरेड तालुक्यातील तितूर येथील तरुण शेतकरी मंगेश मोतीराम जपुलकर यांचे सुमारे ६८ लाख २७ हजार रुपये लंपास केले आहे.
आरोपींनी मागील २०१३ मध्ये जपुलकर यांना आधुनिक शेतीचे स्वप्न दाखवून त्यांना आपल्या शेतावर ‘शेडनेट व पॉलिहाऊस’ उभारण्याचा सल्ला दिला. सोबतच त्यासाठी लागणारे बँक कर्जही उपलब्ध करून देण्याची हमी दिली आली. त्यानुसार जपुलकर यांनी ‘शेडनेट व पॉलिहाऊस’ उभारण्याचा निर्णय घेतला आणि आरोपींच्या सल्ल्यानुसार आपली संपूर्ण शेती व नागपुरातील राहते घर उमरेड येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गहाण करून सुमारे ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले.
यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून जपुलकर यांना ‘शेडनेट व पॉलिहाऊस’साठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य देऊन, त्यांच्याकडील संपूर्ण ६७ लाखांची रक्कम हडप केली. दुसरीकडे ते संपूर्ण साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने जपुलकर यांच्या शेतावरील ‘शेडनेट व पॉलिहाऊस’ काहीच दिवसांत जमीनदोस्त झाले. मात्र तोपर्यंत सर्व आरोपी शेतकऱ्याचा पैसा घेऊन पसार झाले होते. तेव्हापासून जपुलकर यांनी कृषी विभागासह पोलीस, जिल्हाधिकारी व मंत्र्यांना अनेक तक्रारी दिल्या. परंतु त्याची कुठेही दखल घेण्यात आली नाही. शेवटी जपुलकर राज्याचे लोकायुक्तापर्यंत पोहोचले. लोकायुक्तांनी अलीकडेच सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून ही कारवाई केली आहे.(प्रतिनिधी)