नागपुरात संघ मुख्यालय परिसरात चित्रण करणारे बंगळुरूचे दोन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 09:47 PM2020-03-06T21:47:37+5:302020-03-06T21:49:21+5:30
संघ मुख्यालयाचे चित्रण करण्याच्या प्रयत्न करून बंगळूरूच्या दोन तरुणांनी सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. या दोघांना ताब्यात घेऊन तब्बल १५ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघ मुख्यालयाचे चित्रण करण्याच्या प्रयत्न करून बंगळूरूच्या दोन तरुणांनी सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली. या दोघांना ताब्यात घेऊन तब्बल १५ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते शॉर्ट फिल्म बनविणारे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना पोलिसांनी मोकळे केले.
फैजल (वय ३२) आणि निलोत्तम (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही बंगळुरू शहरातील रहिवासी आहेत. डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म मेकर असलेले हे दोघे रायपूरला आयोजित इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. ते आटोपल्यानंतर गुरुवारी ते रायपूरहून नागपुरात पोहचले. बंगळुरूला जाणारी ट्रेन मध्यरात्री होती. त्यामुळे त्यांनी नागपुरातील काही ऐतिहासिक स्थळांची पाहणी करण्याच्या हेतूने फिरत फिरत संघ मुख्यालयाचा परिसर गाठला. गुरुवारी रात्री ते ८ च्या सुमारास संघ मुख्यालयाच्या परिसरात पोहचले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वी संघ मुख्यालयावर आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक पोलिसांनी तो उधळून लावला. तेव्हापासून दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर संघ मुख्यालय आहे. त्यामुळे येथे अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षक डोळळ्यात तेल घालून संघ मुख्यालयाभोवती तैनात असतात.
फैजल आणि निलोत्तम या परिसराची वेगवेगळळ्या अँगलने ते फोटोग्राफी करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. सशस्त्र पोलिसांनी पकडल्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. त्यात त्यांची नावे, भाषा अन् एकूणच वर्तन सुरक्षा यंत्रणांचाही संशय वाढवणारे ठरले. त्यामुळे दोन संशयीत संघ मुख्यालय परिसरात फोटोग्राफी करताना पकडल्याचे वृत्त पोलीस दलात व्हायरल झाले. परिणामी सुरक्षा यंत्रणात प्रचंड खळबळ उडाली. वरिष्ठांनी त्यांना कोतवाली ठाण्यात आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार या दोघांना कोतवाली ठाण्यात आणून त्यांची गुरुवारी रात्री ९ वाजतापासून तो आज दुपारी १२ वाजेपर्यंत कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, एटीएस आणि नक्षलविरोधी अभियानाची मंडळीही ठाण्यात पोहचली.
बंगळुरू पोलिसांकडून शहानिशा
स्थानिक वरिष्ठांनी बंगळुरू पोलिसांशी संपर्क साधला. दोघांचाही रेकॉर्ड मागविण्यात आला. त्यातून त्यांची शहानिशा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचे आणि त्यांचा रेकॉर्ड वादग्रस्त नसल्याचा अभिप्राय बंगळुरू पोलिसांकडून मिळाला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. परिणामी या दोघांना शुक्रवारी दुपारी मोकळे करण्यात आले.
काहीही संशयास्पद नाही : पोलीस आयुक्त
या संबंधाने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी संपर्क करून त्यांना विचारणा केली असता त्यांनी फैजल आणि निलोत्तम फिल्म मेकर असल्याचे आणि त्यांच्याकडे काही संशयास्पद वस्तू अथवा साहित्य आढळले नसल्याचे सांगितले. त्यांची सर्व बाजूने चौकशी केल्यानंतर आमचे समाधान झाल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.