महापालिकेचे दोन लाचखोर जेरबंद
By admin | Published: August 26, 2015 03:04 AM2015-08-26T03:04:24+5:302015-08-26T03:04:24+5:30
नवीन फ्लॅट स्कीममध्ये महापालिकेचे नळाचे कनेक्शन देण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्यासह दोघांच्या मंगळवारी एसीबीने मुसक्या बांधल्या.
नागपूर : नवीन फ्लॅट स्कीममध्ये महापालिकेचे नळाचे कनेक्शन देण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्यासह दोघांच्या मंगळवारी एसीबीने मुसक्या बांधल्या. रमेश हिरामण कोहाड (वय ५०) आणि राहुल रमेश उंबरकर (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही महापालिकेच्या नेहरूनगर झोन क्रमांक ५ मध्ये अनुक्रमे शाखा अभियंता तसेच आॅफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार प्रशांत पंजाबराव सौदागर हे दहलीज बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स येथे नोकरीला आहेत. बिल्डरने आराधना नगर, दिघोरी येथे दोन सहनिवास प्रकल्प (फ्लॅट स्कीम) तयार केल्या आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन घेण्याकरिता नेहरू नगर झोन क्र. ५ मध्ये बिल्डरतर्फे रीतसर अर्ज करण्यात आला होता. २४ आॅगस्टला राहुल उंबरकरने सौदागर यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. नळ कनेक्शनसाठी प्रत्येकी ७ या प्रमाणे एकूण १४ हजार रुपये द्यावे लागतील, तुम्ही कोहाड साहेबांशी बोलून घ्या, असे तो म्हणाला. बिल्डरला विचारून सांगतो, असे म्हणत सौदागरने सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जैन यांनी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सौदागरने उंबरकर आणि कोहाडला लाच देण्याची तयारी दाखवून त्यांच्याशी सौदेबाजी केली. १४ ऐवजी १२ हजारात सौदा पक्का केल्यानंतर मंगळवारी दुपारी सौदागर कोहाडच्या कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन गेले.
त्यांच्याकडून लाच स्वीकारताच बाजूलाच दबा धरून बसलेले पोलीस उपअधीक्षक किसन पवार, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे, हवालदार संजय ठाकूर, मिलिंद हलमारे, मनीष कावळे, प्रभाकर बल्ले, संतोष मिश्रा यांनी कोहाड आणि उंबरकरच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)