दोन लाचखोर पोलीस गजाआड

By admin | Published: February 18, 2017 02:21 AM2017-02-18T02:21:05+5:302017-02-18T02:21:05+5:30

सराफा व्यावसायिकाला चोरीचे सोने घेण्याच्या आरोपात अटक करण्याची भीती दाखवून पाच हजारांची लाच मागणाऱ्या

Two bribey police junk | दोन लाचखोर पोलीस गजाआड

दोन लाचखोर पोलीस गजाआड

Next

एसीबीने बांधल्या मुसक्या :

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात खळबळ
नागपूर : सराफा व्यावसायिकाला चोरीचे सोने घेण्याच्या आरोपात अटक करण्याची भीती दाखवून पाच हजारांची लाच मागणाऱ्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी मुसक्या बांधल्या. नायक पोलीस शिपाई संजय मारोतराव बांगडकर (वय ४५) आणि पोलीस शिपाई शोएब हबीब शेख (वय ३२) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपीला अटक केल्यानंतर त्याने चोरीचे सोने पारडीतील सराफाच्या दुकानात विकल्याचे सांगितले. सोने जप्तीची प्रक्रिया करताना आरोपी नायक पोलीस बांगडकर याने सराफा व्यावसायिकाचे बयान नोंदविले. त्यानंतर त्याला तुमच्या मुलाने हे चोरीचे सोने विकत घेतल्यामुळे त्यालाही अटक करतो, अशी भीती दाखवून कारवाई टाळण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. ४ फेब्रुवारीला बांगडकर याने लाच मागितल्याचे फिर्यादी सराफाने रेकॉर्डींग केले. त्यानंतर बांगडकर वारंवार लाचेची रक्कम मागू लागल्याने त्रस्त झालेल्या सराफा व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर सापळा रचला. ठरल्यानुसार, बांगडकरचा फोन येताच सराफा व्यावसायिकाने लाचेची रक्कम शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्यात घेऊन येतो, असे सांगितले. सराफा व्यावसायिक लाचेची रक्कम घेऊन बांगडकरकडे जाताच त्याने ती रक्कम पोलीस शिपाई शोएब हबीबकडे देण्यास सांगितले.

शोएबने ही रक्कम तिसऱ्या व्यक्तीकडे देण्यास सांगितले. त्या व्यक्तीने रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याच्यासोबतच बांगडकरच्याही मुसक्या बांधल्या. ही कारवाई पोलीस उपायुक्त महेश चिमटे, अतिरिक्त अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भावना धुमाळ, मोनाली चौधरी, शिपाई गौतम राऊत, श्रीकांत हत्तीमारे (भंडारा) तसेच शिपाई दीप्ती मोटघरे, शालिनी जांभूळकर, नायक उत्तमदास यांनी बजावली.
वादग्रस्त पोलीस ठाणे
गेल्या काही महिन्यांपासून हुडकेश्वरचे पोलीस ठाणे कमालीचे वादग्रस्त ठरले आहे. लाचखोरी आणि मांडवलीसाठी हे पोलीस ठाणे कुपरिचित असून, यापूर्वीही येथे अनेकदा एसीबीची कारवाई झाली आहे. एवढे होऊनही जमिनी किंवा बिल्डरशी संबंधित प्रकरणाला विशिष्ट पद्धतीने हाताळण्यात सराईत असलेले या ठाण्यातील काही अधिकारी कर्मचारी नेहमीच चर्चेत असतात. आज एसीबीने पकडलेल्यांनी ‘साहेबां’च्या सांगण्यावरून लाच मागितल्याचे म्हटले. त्यामुळे हे साहेब कोण, त्याचा एसीबीचे अधिकारी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: Two bribey police junk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.