चाकु मारून गंभीर जखमी करणाऱ्या दोन भावांना बेड्या
By दयानंद पाईकराव | Updated: May 20, 2024 16:02 IST2024-05-20T16:02:06+5:302024-05-20T16:02:43+5:30
Nagpur : एका युवकाला गंभीर जखमी करणाऱ्या दोन भावांना प्रतापनगर पोलिसांनी केले गजाआड

Two brothers arrested for attacking a peroson
नागपूर : जुन्या वादातून चाकुने वार करून एका युवकाला गंभीर जखमी करणाऱ्या दोन भावांना प्रतापनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. कुलदिप उर्फ कुन्नु शंकरलाल भारद्वाज (२०), सतिश शंकरलाल भारद्वाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी भावांची नावे आहेत.
रविवारी १९ मे रोजी रात्री १० वाजता फिर्यादी साहिल धीरज शेंद्रे (१९, रा. जुगलकिशोर, ले-आऊट, गोपालनगर) हा आपल्या शेजारी राहणारा मित्र आशिष महादेव लोखंडे व त्याचा चुलतभाऊ विशाल मिलींद लोखंडे यांच्यासोबत प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्यामनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळून जात होता. तेवढ्यात आरोपी कुलदिप उर्फ कुन्नु आणि सतिश यांनी संगणमत करून आशिष लोखंडेसोबत असलेल्या जुन्या भांडणावरून साहिल व लोखंडे बंधुंना मारहाण केली.
आरोपी सतिशने आपल्या जवळील चाकुने साहिलच्या पोटावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर साहिल व लोखंडे बंधु तेथून पळून गेले. जखमी साहिलला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपी भारद्वाज बंधुंविरुद्ध कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास प्रतापनगर पोलिस करीत आहेत.