दोन सीए व कोळसा व्यापाऱ्यांकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:52+5:302021-06-18T04:06:52+5:30
- मुंबई ईडीची कारवाई : अनिल देशमुख प्रकरणाशी संबंध नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या प्रकरणात मुंबईच्या ...
- मुंबई ईडीची कारवाई : अनिल देशमुख प्रकरणाशी संबंध
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या प्रकरणात मुंबईच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नागपुरातील दोन नामांकित सीए आणि कोळसा व्यावसायिक अशा तीन लोकांवर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी सकाळी सुरू झालेली कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. तिघेही अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.
सर्वप्रथम वर्धमाननगर येथील कोळसा व्यावसायिक धरमपाल अग्रवाल यांच्या घरी आणि प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर रामदासपेठ येथील सीए सुधीर बाहेती आणि सीए भाविक पंजवानी यांच्या कार्यालयावर अधिकाऱ्यांनी धाड टाकली. बाहेती यांचे रामदासपेठेत कार्यालय आहे. एका सीएच्या कार्यालयातून अधिकाऱ्यांना रोख रक्कम सापडल्याची माहिती आहे. या लोकांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री देशमुख यांनी गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे. ही गुंतवणूक मनी लॉन्ड्रिंगमध्ये मोडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्यावर कारवाई केली होती. ही कारवाई रात्रीपर्यंत चालली होती. या दोन्ही प्रकरणांचे एकमेकांशी संबंध आहेत का, याची चौकशी अधिकारी करीत आहेत.